खानिवडे: वसईतल्या कळंब राजोडी समुद्र किनार्या दरम्यानच्या सागरात एक अज्ञात वस्तू दिसून आल्याने या भागात काहीशी खळबळ माजली होती. मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान किनार्यावरील नागरिकांना दिसून आलेल्या सदर अज्ञात वस्तू काय असेल, सागरातून किनार्याकडे आली तर त्यापासून आपल्याला काही धोका उद्भवेल का? अशा अनेक शंका कुशंका वर्तवल्या जात होत्या. या बाबत त्यांनी येथील जीव रक्षकांना माहिती दिल्यानंतर सार्या यंत्रणा सजग झाल्या.मात्र ती तरंगत आलेली वस्तू एक कंटेनर असल्याचे समजले.
दरम्यान, किनार्यावर टेहळणी मनोरे नसल्यामुळे सदर नेमकी वस्तू काय आहे ? हे पडताळणी करण्यात बराच वेळ वाया गेला. त्यामुळे वसईच्या किनार्यावर टेहळणी मनोरे असणे अत्यंत आवश्यक झाल्याचे अधोरेखित झाले आहे. याबाबत अनेकदा लेखी मागणी करूनही शासनाने त्याची पूर्तता केली नाही. अधिक माहितीनुसार, मंगळवारी मोठी भरती असल्यामुळे बोटीतून आत जाऊन या कंटेनरची पाहणी करणे काही काळ अडचणीचे ठरले होते. तरी बंदर अधिकारी, स्थानिक पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन कंटेनर काढण्याचे प्रयत्न केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीत इंडियन नेव्हीने याबाबत सूचना दिली होती. पाकिस्तान कराची मधुन चीनमधे समुद्र मार्गे जाणार्या जहाजातुन एक कंटेनर पडला असल्याचा संदेश देण्यात आला होता.मुंबई नौदलाने या अज्ञात कंटेनर बाबत काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. त्यानुसार 20 ते 21 जुलै रोजी पूर्व दिशेला जात असलेला सदर कंटेनर पश्चिम महाराष्ट्राच्या किनार्यावर किंवा दक्षिण गुजरातच्या दिशेने दिसण्याची शक्यता वर्तवली होती. ही वार्ता समजताच धास्तावलेल्या रहिवाश्यांना हायसे वाटले सकाळी सर्व यंत्रणा जागेवर पोहोचुन सदर कंटेनर ताब्यात घेतल्याची माहिती बंदर निरीक्षक नवनीत निजाई यांनी दिली.