नालासोपारा : विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथे अनेक वर्षापासून पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांनी वचनपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाजपाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. तेव्हा स्थानिक महिला पत्रकार कव्हरेज करत असताना मुलाखत घेत असताना डीजेचा आवाज कमी करा असे सांगितल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की करून अर्वाच्य भाषेत व्यवहार केला.
याबद्दल महिला पत्रकाराने बोळींज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र सदर गुन्ह्यातील आरोपी मोकाट असल्याने त्याच्यावर त्वरित कारवाई करावी यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जनार्दन पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आरोपीवर कारवाई करा यासाठी जमा झाले होते. मात्र पोलिसांनी सिंग यांच्या आरोपीला अटक करण्याऐवजी खंबीरपणे उभे राहणाऱ्या माजी आमदार क्षितीज ठाकूर, उबाठाचे जनार्दन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर जमाबंदी आदेशाचे गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद ठिकाणी या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच जोरजोराने घोषणा देत सार्वजनीक शांतता भंग केली. ही कारवाई पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांनी काढलेल्या मनाई आदेश नुसार करण्यात आली आहे. या आदेशानुसार 06 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जमावबंदी लागू होती. पोलिसांनी सांगितले की,मनाई आदेशाचे उल्लंघन केले असून, याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.