खानिवडे : गेल्या दिवसांपासून हवामानाच्या लहरीपणामुळे सर्वत्र बळीराजा पुरता बेजार झाल्याचे चित्र आहे. काहि दिवसांपुर्वी जिल्ह्यासह सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्व पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून सावरत असतानाच येत्या दोन दिवसात पुन्हा जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावासाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे बळीराजांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.
प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी तयार कापण्या स्थगित ठेवल्या आहेत. तर मागील काही दिवसांपासून पडलेल्या छान उन्हामुळे अगदी तयार झालेल्या हलवार पीक कापण्या ज्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या त्या पूर्ण सुकल्या नसल्या तरी त्यांना सुरक्षित स्थळी ठेवून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 17आक्टोम्बर रोजी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे.यामध्ये मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट सुद्धा होणार असल्याचा तर्क देण्यात आला आहे. तर 18ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील वाडा,जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस अंदाजित असून जव्हार तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
परिणाम जिल्ह्यातील तयार हलवार व निम गरवार पिकांच्या कापण्या शेतकऱ्यांनी लांबणीवर टाकल्या आहेत. यामुळे आधीच हैराण शेतकऱ्यांना आता लांबून आणलेल्या मजुरांची मजुरी व जेवणखाणे यांच्या खर्चाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
यंदाच्या सततच्या पावसामुळे सर्वत्र जमीन ओलीच असल्याने शेतखळे करणे शक्य होत नाही.त्यामुळे कापणी केलेले पीक घरांच्या ओट्यावर कसेबसे ठेवण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.मात्र ज्यांच्या घराला ओटा नाही किंवा दुसरी सुरक्षित सोय नाही ते अडचणीत सापडले आहेत.
यंदा पाच महिने झालेल्या पावसानंतर पुन्हा पाऊस म्हणजे भात शेतीचे नुकसानच होणार असल्याने व शासकीय मदतीतून वसई तालुका वगळल्याच्या खबरीमुळे पावसाने झोडपले व राजाने मारले तर तक्रार करणार कोणाकडे या विवंचनेने वसईचा शेतकरी धास्तावला आहे.दरम्यान शेती सोबतच जिल्ह्यात पावसामुळे घरांचे व इतर मालमत्तेचे सणासुदीच्या काळात झालेल्या नुकसानीमुळे नागरिक पुरते बेजार झाले असून योग्य भरपाईची अपेक्षा आहे.
यंदा लागोपाठ पाच महिने पाऊस बरसला. मात्र मागील काही दिवसांपासून वसईत पडलेले जाड धुके आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे पाऊस आता संपला असे समजून काढणीला आलेल्या पिकांची कापणी शेतकऱ्यांनी केली. मात्र उर्वरित कापण्यां लांबणार असल्याने कापणीसाठी दुसऱ्या तालुक्यातून आणलेल्या मजुरांना बसून मजुरी द्यावी लागणार आहे. एकतर मजूर मिळत नाहीत, ते मिळवले पण आमचा अतिरिक्त खर्च वाढणार आहे.लक्ष्मीप्रसाद पाटील, शेतकरी, आडणे, वसई पूर्व ग्रामीण भाग