Bullet train project | बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे नागरिक हैराण pudhari photo
पालघर

Bullet train project | बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे नागरिक हैराण

मांडे ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

पुढारी वृत्तसेवा

सफाळे : मुंबई-अहमदाबाद अतिजलद (बुलेट ट्रेन) प्रकल्पाचे काम पालघर जिल्ह्यातील मांडे ग्रामपंचायत हद्दीत वेगाने सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामामुळे गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व लहान बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून ग्रामपंचायतीने संबंधित प्रकल्प अधिकार्‍यांकडे विविध समस्यांबाबत निवेदन दिले आहे. ग्रामपंचायत मांडेच्या या निवेदनाकडे प्रकल्प यंत्रणेने सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे. अन्यथा ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्रामपंचायत मांडेने प्रकल्प संचालक व सक्षम अधिकार्‍यांना पाठवलेल्या निवेदनात या प्रकल्पासाठी तोडलेला शाळेचा रस्ता त्वरित नव्याने करावा, ग्रामपंचायत मुख्य रस्त्यापासून जिल्हा परिषद शाळेपर्यंतचा पक्का रस्ता प्रकल्पकामामुळे तोडण्यात आला असून पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे लहान बालकांना व विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. तात्काळ काँक्रिट रस्त्याची मागणी करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनच्या बांधकामामुळे अनेक नैसर्गिक नाले अडवल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होत आहे. अशा ठिकाणी जलवाहिनी पाईप्स बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

विज व पाणी यांची एकाच ठिकाणी लावलेली लाईन धोकादायक असून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ अंडरग्राउंड पाणी व विजेच्या केबल्स एकत्र लावण्यात आल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला योग्य बदल करण्याची विनंती केली आहे. दैनंदिन अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मांजुर्ली ते शिलटे (वाण्याचा पाडा) या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून नव्याने काँक्रिटीकरण करून देण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा रस्ता नव्याने बांधावा. कामनीष राऊत यांच्या घरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत असलेला रस्ता प्रकल्पामुळे खराब झाल्याने तो नव्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रकल्पामुळे शासकीय जागा बाधित झाल्याने जिल्हा परिषद शाळेसाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

स्फोटांमुळे ग्रामपंचायत कार्यालयास तडा

झाडांचा व शेती नुकसानाचा मोबदला मिळावा, प्रकल्पामुळे अनेक शेतकर्‍यांच्या आणि ग्रामपंचायतच्या मालकीच्या झाडांचे नुकसान झाले असून त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी. ग्रामपंचायत कार्यालयाला तडा गेल्या असून टनल खोदाई (टर्नर) दरम्यान वापरण्यात आलेल्या शक्तिशाली स्फोटकांमुळे ग्रामपंचायत कार्यालयास तडा गेला आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने स्थानिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे स्थानिकांना त्रास होऊ नये अशा सूचना आम्ही वारंवार त्यांना देत असतो, मात्र या सूचनांची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही. त्यामुळे सुरू असलेले काम बंद करण्याचे नियोजन सुरू आहे.
महेंद्र पाटील, सरपंच मांडे विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT