पालघर - पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील सफाळे आणि केळवे रोड रेल्वेस्थानका दरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गुजरातकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
डहाणू व पुढे गुजरातकडे या वेळेत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवांसह लांब कल्याणच्या सेवा गेल्या वीस पंचवीस मिनिटांपासून ठप्प आहेत. प्रचंड ऊन रेल्वे प्रवाशांना सहन करावे लागत आहेत. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. गुजरात कडे जाणारी बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे सकाळी केळवेदरम्यान तिला थांबवण्यात आले. ही गाडी पुढे जाईल, अशी आशा असताना इंजिनच्या बिघाडामुळे ती जागीच थांबून होती. तिच्या पाठीमागून येणाऱ्या सर्व उपनगरीय लोकल सेवा यामुळे ठप्प झाली. डाऊन मार्गावरील लोकल गाड्या वीस ते पंचवीस मिनिट उशिराने धावत आहेत तर डाऊन मार्गावरील पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम झाला आहे.
गुजरातकडील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असली तरी मुंबईकडे जाणारी सेवा सुरळीत सुरू आहे. डहाणूपर्यंत जाणाऱ्या लोकल गाड्या पालघर रेल्वे स्थानकांवर रोखून ठेवण्यात आल्या आहेत. इंजिनमधील बिघाड दूर करण्याचे काम सुरू असून हा बिघाड दूर झाल्यानंतर रेल्वे सेवा हळूहळू पूर्व पदावर येईल, असे सांगण्यात येत आहे.