वाडा : एकाच आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा झालेला आक्समिक मृत्यू सर्वानांच धक्का देऊन गेला आहे. आंबिस्ते शासकीय आश्रम शाळेत शिकणार्या देविदास परशुराम नावले ( दहावी) तर मनोज सिताराम वड (नववी) या दोघांचे मृतदेह शाळेच्या पाठिमागे वसतिगृहाच्या समोर असलेल्या एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. त्यामुळे जीवन संपवले की घातपात याबाबत आता तपास सुरू झाला आहे. एवढ्या लहान वयातील विद्यार्थी जीवन का संपवतील असा सवाल उपस्थीत होत आहे.
वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द गावातील अनुदानित आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांनी गळफास लावून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. आश्रमशाळेच्या जवळच पहाटेच्या सुमारास झाडाला लटकून जीवन संपवले असून जीवन संपवल्याचे कारण मात्र अजून गुलदस्त्यात आहे. आश्रमशाळेतील सुरक्षारक्षकाच्या हा प्रकार रात्रीच लक्षात आला. मात्र तोपर्यंत खूप वेळ झाल्याचे त्यांनी सांगितले. वाडा पोलिसांनी याबाबत गुन्ह्याची नोंद केली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
देविदास नावले , तर मनोज वड मोखाडा तालुक्यातील दापटी गावातील ते दोघेही रहिवाशी आहेत. पहिलीपासून हे दोन्ही विद्यार्थी याच आश्रमशाळेत शिकत असून त्यांनी अचानक उचललेल्या या टोकाच्या पावलाने पालक हवालदिल झाले आहेत. पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाच्या माध्यमातून ही माध्यमिक आश्रमशाळा चालविली जात असून मूल व मुली मिळून एकूण 520 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
जीवन संपवणा-या या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन असून तीन ते चार दिवसांपासून ते अन्य विद्यार्थ्यांशी जीवन संपवण्या बद्दल सांगत असल्याची माहिती काही विद्यार्थ्यांनी दिली आहे. जीवन संपवण्याचे कोणतेही ठोस कारण किंवा मृत्यूपूर्वीची कोणती चिठ्ठी मिळाली नसून मृत्यूचे कारण यामुळे शोधणे यंत्रणांसाठी आव्हानात्मक बनले आहे.
शाळेत मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नसून आम्हीही धक्क्यात आहोत असे अधिक्षक राजू सावकारे यांनी सांगितले. मात्र मुलांच्या जीवन संपवण्याचे कारण शोधा अन्यथा आंदोलक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मृतांच्या नातेवाईकांनी दिला आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणी सखोल तपास सुरू करण्यात आला असून या गंभीर प्रकाराबाबात विविध चर्चांना उधान आले आहे. तपासानंतर घटनेचे नेमके कारण कळू शकणार आहे.