सिंहस्थासाठी 25 हजारांचा पोलिस फौजफाटा राहणार असल्याची माहिती दै. 'पुढारी' कार्यालयाच्या सदिच्छा भेटीत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Simhastha Kumbh Mela Nashik : सिंहस्थासाठी 25 हजारांचा पोलिस फौजफाटा

दै. 'पुढारी' कार्यालयाच्या सदिच्छा भेटीत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यवधी भाविक तसेच साधू- महंत येणार आहेत. या कालावधीत भाविक आणि साधू- महंतांच्या सुरक्षेसाठी तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तब्बल २५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. (Nashik Kumbh Mela)

पोलिसांच्या या फौजफाट्यात नाशिक पोलिस दलातील ३ हजार पोलिसांबरोबरच २२ हजार पोलिस जिल्ह्याबाहेरून मागविले जाणार आहेत. सिंहस्थासाठी पोलिस यंत्रणेकडून सुरक्षाविषयक आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

पोलिस आयुक्त कर्णिक यांनी मंगळवारी (दि. १७) दै. 'पुढारी'च्या नाशिक आवृत्तीच्या कार्यालयास भेट दिली. निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ब्यूरो मॅनेजर राजेश पाटील, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण विभागप्रमुख शरद धनवटे उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयामार्फत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी कर्णिक यांनी माहिती दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून, सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय राखून सिंहस्थ यशस्वी पार पाडला जाईल. प्रयागराज येथे झालेल्या सिंहस्थाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, नाशिकच्या सिंहस्थातही कोट्यवधी भाविक येतील असा अंदाज आहे. या कालावधीत बंदोबस्तासाठी स्थानिक तीन हजार पोलिस तैनात केले जातील. त्याचबरोबर अन्य जिल्ह्यांतून २२ हजार पोलिसांची कुमक मागविली जाणार असल्याचे कर्णिक म्हणाले. (Commissioner of Police Sandeep Karnik)

शहरातील अतिक्रमणे, वाहतूक कोंडी मोडीत काढण्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच लोकप्रतिनिधींचाही सहभाग महत्त्वाचा आहे. नाशिकमधील द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आ. देवयानी फरांदे यांनी घेतलेला पुढाकार शासकीय यंत्रणांना बळ देणारा आहे.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेसह अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे. शहरात प्रायोगिक तत्त्वावर नाशिक पश्चिम विभागात पार्किंग झोन्सची निर्मिती केली जात असून, नो पार्कींगमध्ये वाहने पार्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात त्याची अंमलबजावणी केली जाईल. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमले जाणार आहेत. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती कर्णिक यांनी दिली.

अल्पवयीनांमधील गुन्हेगारी मोडण्यासाठी म्होरके टार्गेटवर

गेल्या काही महिन्यांत शहरातील विविध गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीनांचा सहभाग वाढलेला दिसतो. या घटनांचा अभ्यास केला असता, अल्पवयीनांची दिशाभूल करून त्यांच्याकडून गुन्हे घडविले जात असल्याचे दिसते. त्यामुळे अशा घटनांमध्ये आता अल्पवयीनांना गुन्ह्यांसाठी प्रवृत्त करणारे म्होरके पोलिसांच्या टार्गेटवर असून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त कर्णिक यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT