पुरोगामी महाराष्ट्रात २८ नरबळीच्या घटना File Photo
नाशिक

Maharashtra Human Sacrifice | धक्कादायक : पुरोगामी महाराष्ट्रात २८ नरबळीच्या घटना

पुढारी वृत्तसेवा
नाशिक : सतीश डोंगरे

२१ व्या शतकातही समाजमनावर तांत्रिक, मांत्रिक आणि भोंदूबाबांचे गारूड कायम असून, चमत्कारातून भीतीचा अघोरी खेळ खेळण्याचे प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात सुरूच आहेत. विज्ञानवादी दृष्टिकोनाला बाजूला सारत आजही नरबळीसारखे कृत्य अनेकांच्या हातून घडत असून, गेल्या ११ वर्षांत तब्बल २८ नरबळीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. कायद्याचा धाक असतानाही अशा प्रकारचे अघोरी प्रकार सुरूच असून, कायद्याची पुरेशी जनजागृती झाली नसल्याचे हे द्योतक नसावे ना, अशी शंका आता उपस्थित होत आहे.

फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेला थारा नसावा यासाठी लढा देणारे विवेकवादी विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर २६ ऑगस्ट २०१३ मध्ये महाराष्ट्रात जादूटोणा, अघोरी कृत्य, नरबळी आणि काळी जादूविरोधी कायदा लागू केला गेला. मात्र, त्यानंतरही अंधश्रद्धेचे प्रकार थांबत नसल्याचे चित्र आहे. या कायद्याअंतर्गत आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक गुन्हे राज्यात दाखल झाल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे कायदा लागू झाला तेव्हापासून तब्बल २८ नरबळीच्या घटना समोर आल्या असून, या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. यातील बहुतांश घटना दिव्यदृष्टी, पैशांचा पाऊस, भाऊबंदकीत मालमत्ता विवादात झालेल्या दुश्मनीतून मुक्तता, गुप्तधनाचा शोध, पुत्रप्राप्ती आदी कारणांसाठी नरबळी दिल्याचे समोर आले आहे. नरबळीच्या या घटनांमधील क्रौर्य अंगावर शहारे आणणारे असून, या कृत्यातील आरोपींच्या मनात कायद्याची भीतीच नसल्याचे अधोरेखित करीत आहे. दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी शासनाने जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी अंनिसच्या वतीने केली जात आहे.

या घटनांनी हादरला महाराष्ट्र

- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घाटी येथे एका रिक्षाचालकाने दिव्यदृष्टी प्राप्तीसाठी पायाळू मुलाचे डोळे व किडनी काढून नंतर त्याची भाजी करून खाल्ली.

- नोटांचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने मेहरूणच्या (जळगाव) सहावर्षीय बालकाचे अपहरण करून त्याचा मुक्ताईनगरच्या जंगलात खून केला गेला. नंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.

- यवतमाळ येथे एकाने आई व मावशीला तीन दिवस डांबून ठेवले. अमावस्येच्या रात्री दोघींना विवस्त्र जंगलात नेऊन मुलाच्या मांडीवर आईचा नरबळी दिला.

- तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच आई-वडिलांनी बारावीत असलेल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार कराडमध्ये घडला होता.

- शेगाव तालुक्यातील नागझरी येथे १४ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केली. हत्येनंतर डोक्यावर हातोड्याने वार करून त्याचा मृतदेह जंगलात ठेवला होता.

- मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचा नरबळी दिल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनाळी येथे घडली होती. हा मुलगा वास्तुशांतीसाठी आजोबांच्या घरी आला होता.

लहानगे ठरतात बळी

नरबळीच्या बहुतांश घटनांमध्ये लहानग्यांचा बळी देण्यात आल्याचे दिसून येते. मालेगावमध्ये जुलै २०२३ मध्ये गुप्तधनासाठी एका आठवर्षीय चिमुरड्याचा, तर २०१९ मध्ये मंगळवेढ्यात ९ वर्षाच्या चिमुरड्याचा बळी दिला होता. अन्य घटनांमध्येदेखील लहानग्यांना शिकार केले गेले. बहुतांश नरबळीच्या घटनांमध्ये जवळच्याच व्यक्तीचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याने नरबळी विरोधात कायदा केलेला आहे. यानंतर कर्नाटक व केरळ या राज्याने कायदे केले, पण त्यांनी आपल्या राज्यात नियमही केलेले आहेत. महाराष्ट्रात अजूनही या कायद्याचे नियम न केल्याने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे अंनिसचे निरीक्षण आहे.

कायदा केल्यानंतरही महाराष्ट्रात ज्या गतीने नरबळीच्या घटना घडत आहेत, यावरून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अंनिसच्या माध्यमातून आम्ही शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जनजागृतीचे काम करत आहोत.
- डी. एस. कट्यारे, कार्याध्यक्ष, अंनिस

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT