नाशिकरोड: मुंबई येथून अमरावतीकडे रेल्वेने जात असलेल्या व्यापाऱ्याच्या ताब्यातील ५२ तोळे सोन्याचे व तीन किलो चांदीचे दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. मात्र रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवत मनमाडजवळील परिसरातून चोरट्याला पकडण्यात यश मिळवत सुमारे ५६ लाख ६८ हजाराचे दागिने जप्त केले.
दादर (मुंबई) येथील सराफ व्यवसायिक प्रदीपकुमार धर्मपाल सिंह हे १० ऑक्टोबर रोजी मुंबई-हावडा मेलने अमरावती येथे सराफ व्यावसायिकांना दागिने पुरविण्यासाठी चालले होते. त्यांच्याकडे ५२ तोळे सोने आणि ३ किलो चांदी असलेली बॅग होती. मात्र, नाशिक रोड रेल्वे स्थानक आल्यानंतर त्यांना बॅग गायब झाल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक नवीन प्रताप सिंह आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. मनमाडकडे गाडी जात असताना पथकाने संशयित हालचाली करणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू केली. राधे गज्जू बिसोने (वय ३०, रा. मध्यप्रदेश) हा व्यक्ती संशयाच्या जाळ्यात सापडला. त्याची कसून तपासणी केली असता त्याच्या ताब्यातील पिशवीत चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने आढळले. त्याला ताब्यात घेण्यात आले.
यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक संतोष उफाडे-पाटील, धनंजय नाईक, शैलेंद्र पाटील, राज बच्छाव, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक अंबिका यादव, मच्छिंद्र लांडगे, गौतम बिराडे, सुनील गडाख, सागर वर्मा, मनीष कुमार, के. के. यादव यांनी ही कारवाई केली.