नाशिक: सातपूर नंदिनी नदीपात्रात अनधिकृत इमारत जेसीबीच्या साहाय्यने जमीनदोस्त करताना महापालिकेचे कर्मचारी.  (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Prakash Londhe RPI (A) : आरपीआय नेत्याच्या 'किल्ल्या'वर 'बुलडोझर'

गुन्हेगारी साम्राज्य उद्धवस्त ; प्रकाश लोंढेची अनधिकृत इमारत जमीनदोस्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : खंडणी आणि गोळीबार प्रकरणातील संशयित तथा आरपीआय नेते प्रकाश लोंढे यांच्या गुन्हेगारी कारभाराचा 'किल्ला' असलेल्या अनधिकृत इमारतीवर नाशिक महापालिकेने गुरुवारी (दि. १६) बुलडोझर चालवला. पी. एल. ग्रुप, लोंढे टोळीचा कारभार जेथून चालत होता, त्याच इमारतीवर करण्यात झालेल्या या कारवाईने गुन्हेगारांच्या अवैध मालमत्तांवर महापालिकेने 'हातोडा' चालवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

​आयटीआय सिग्नल-खुटवडनगर मार्गावर असलेली प्रकाश लोंढे यांची ही अनधिकृत इमारत पाडण्याची कारवाई गुरुवारी सकाळी नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरू केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू करण्यात आली.

कारवाईचे नेमके कारण काय?

​लोंढे यांच्या या इमारतीचे बांधकाम नंदिनी नदीच्या पूररेषेत आढळले होते. यासंदर्भात महापालिकेने लोंढे यांना कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत लोंढे किंवा त्यांच्या वतीने कोणीही कागदपत्रे सादर केले नाहीत. मुदत संपल्याने अखेर पालिकेने ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली. दरम्यान, बुधवारी सायंकाळीदेखील परिसरातील काही अतिक्रमण पालिकेने हटवले होते.

​कारभाराच्या ठिकाणावरच कारवाई

​विशेष म्हणजे अतिक्रमित इमारतीमधून प्रकाश लोंढे यांच्या टोळीचा सर्व कारभार चालत होता. त्यामुळे गुन्हेगारी साम्राज्याच्या 'किल्ल्या'वरच कारवाई झाल्याने या घटनेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. महापालिका या कारवाईनंतर परिसरातील लोंढे यांच्या इतर बेकायदा बांधकामांवरही हातोडा चालवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक राजकारणातही या कारवाईचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल, वसुलीचीही तयारी

​या अतिक्रमणप्रकरणी प्रकाश लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला जो काही खर्च येणार आहे, तो सर्व खर्च लोंढे यांच्याकडून वसूल केला जाणार आहे. अनधिकृत पक्के बांधकाम तोडण्यासाठी जेसीबीसाठी रस्ता नव्हता, तो तयार करून इमारत पाडण्याचे काम सुरू आहे आणि दिवसभरात इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू होती.

लोढेंच्या फरार मुलाचा शोध सुरूच

​सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे अद्यापही फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी यापूर्वीच त्याचे वडील प्रकाश लोंढे आणि भाऊ दीपक लोंढे या दोघांना सहआरोपी केले आहे आणि त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT