नाशिक : राज्य सामायिक प्रवेशप्रक्रिया कक्षातर्फे (सीईटी सेल) बी. फार्मसी शिक्षणक्रम प्रवेशप्रक्रियेत शुक्रवारी (दि.3) पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर शनिवार (दि.4) पासून प्रवेश- प्रक्रियेला प्रारंभ झाला. सोमवार (दि.6) ऑक्टोबरपर्यंत या फेरीत आपले प्रवेश निश्चित करू शकणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून फार्मसी प्रवेशप्रक्रिया दीर्घ काळापर्यंत रखडत आहे. यंदाही जवळपास सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फार्मसी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या महाविद्यालय पसंतीक्रम आणि गुणवत्ता यादीनुसार पात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी लगबग दिसून आली. या यादीतील पात्र विद्यार्थी सोमवारपर्यंत प्रवेश निश्चित करू शकतील. दरम्यान, फार्मसीच्या पदवी शिक्षणक्रमासाठी राज्यभरतातील महाविद्यालयांमध्ये 44 हजार 287 जागा आहेत. त्यासाठी 55 हजार 116 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. विलंबाने सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे महाविद्यालयांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ‘रात्र थोडी सोेंगे फार’ अशी अवस्था होणार असून, जलद गतीने ते पूर्ण करावे लागणार आहेत.