डॉक्टरकडून महिलेवर चुकीचे उपचार File photo
नाशिक

Nashik | डॉक्टरकडून महिलेवर चुकीचे उपचार, त्यानंतर शिवीगाळ करुन दमदाटीही केली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : परप्रांतीय महिला रुग्णावर चुकीचे उपचार केल्यानंतर तिला नुकसानभरपाई देण्याचे एका डॉक्टरने मान्य केले. मात्र, कालांतराने पैसे देण्यास नकार देत डॉक्टरने रुग्णास शिवीगाळ करीत धमकावल्याचा प्रकार पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील एका रुग्णालयात घडला.

सौम्या शशिधरण नायर (रा. आंध्र प्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार, पौर्णिमा बसस्टॉपजवळील संतोष मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ऑगस्ट २०२३ मध्ये पित्ताशयात खडे झाल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी रुग्णालयातील संशयित डॉ. संतोष रावलानी यांनी शस्त्रक्रिया करताना निष्काळजीपणा केल्याने सौम्या यांची पित्तनलिका कापून रक्तवाहिनीस छेडछाड केली. त्यामुळे पित्तनलिकेला दुखापत झाली.

तरीदेखील ही माहिती डॉ. रावलानी यांनी सौम्या यांच्यापासून लपवली. त्यानंतर त्रास होत असल्याने सौम्या यांनी नाशिक व पुणे येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले. सौम्या यांनी चुकीच्या उपचाराबाबत डॉ. रावलानी यांना जाब विचारला. त्यावेळी डॉक्टरने त्यांची चूक मान्य केली, तसेच नुकसानभरपाई म्हणून ११ लाख रुपये देण्याचेही मान्य केले. त्यानुसार सौम्या या पैसे घेण्यासाठी डॉ. रावलानी यांच्याकडे गेल्या असत्या डॉक्टरने सौम्या यांना शिवीगाळ केली. तसेच 'कोठेही जा, मी तुला एक रुपया देणार नाही, तसेच महाराष्ट्रातसुद्धा राहू देणार नाही,' अशी धमकी दिली. सौम्या यांच्या वडिलांनाही मारहाण करण्यासाठी डॉ. रावलानी शशिधरण नायर यांच्या अंगावर धावून गेले होते. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात डॉ. संतोष रावलानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT