नाशिक : दुमजली घरातील आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू असतानाच अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात तीन जवान जखमी झाले असून, त्यातील एकास गंभीर दुखापत झाली. चव्हाटा येथील देवी मंदिर चौक परिसरात गुरुवारी (दि. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
मुख्य फायरमन इसहाक शफियोद्दीन शेख (५५), प्रशिक्षणार्थी फायरमन प्रथमेश संंजय वाघ (२१), आकाश भगवान गिते (२९) हे तिघे जखमी झाले आहेत. शेख यांना गंभीर स्वरूपात दुखापत झाली असून, तिघांवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चव्हाटा परिसरात शुभम कृष्णकांत धाडा यांचे दुमजली घर आहे. लाकडी वाड्यातील पहिल्या मजल्यावर मारुती पाटील व त्यावरील मजल्यावर शरद गायकवाड यांचे कुटुंबीय भाडेतत्त्वाने राहतात. नेहमीप्रमाणे दोन्ही कुटुंबीय नोकरीनिमित्त घराबाहेर होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ५ नंतर गायकवाड यांच्या घरातील लाकडी वास्याला आग लागल्याने घरात धूर झाला. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाण्याचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी घरावर पाण्याचा मारा करण्यात आला. घराला कुलूप असल्याने आगीचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाने घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराच्या छतासह दोन्ही मजल्यांमधील फरशीस भगदाड पडले. स्फोटाच्या तीव्रतेने तिघेही कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवून बचावकार्यात मदत केली.
आग लागल्याने व स्फाेटानंतर घरांचे अतोनात नुकसान झाले. त्यात पाटील व गायकवाड यांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. सुदैवाने दोघांच्याही घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. खबरदारी म्हणून परिसरातील वीजपुरवठा काही वेळ खंडित करण्यात आला होता.
घरातून धूर येत असल्याने परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. बचावकार्य सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फाेट झाल्याने कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या आवाजामुळे समोरील घरातील एक महिला बेशुद्ध पडल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच आवाजामुळे परिसरात घबराट पसरली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने परिसरातील गर्दी पांगवली.