नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापुर्वी रस्ता रुंदीकरणासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहिम बुधवारी (दि.15) राबविल्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकत्र येत तीव्र विरोध केला. परंतु विभागीय आयुक्तांनी खासदार आणि आमदारांना ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट करत तिला स्थगितीस नकार दिला.
आमदार सरोज आहेर, आमदार हिरामण खोसकर, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिवसभर प्रशासनाची चर्चा केली. त्यासाठी दिवसभर अधिकारी आणि स्थानिकांसोबक बैठकांचे सत्र झाले. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला. विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांची देखील शिष्टमंडळाने भेट घेऊन कारवाईस स्थगिती देण्याची मागणी केली. परंतू त्यांनी प्रशासनाची भूमिका मांडत कारवाई आवश्यक असल्याचे ठाम शब्दांत स्पष्ट केले.
एनएमआरडीएच्या कारवाईनंतर पिंपगाव बहुला व बेलगाव ढगा गावांच्या हद्दीवर स्थानिकांसमवेत लोकप्रतिनिधींनी बैठक घेतली. त्यानंतर खासदार वाजे, आमदार खोसकर यांसह शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास आले होते. मात्र, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे विभागीय आयुक्त कार्यालयात असल्याने शिष्टमंडळ तेथे जात विभागीय आयुक्त गेडाम यांची भेट घेतली. राज्य शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जात असून स्थगिती देता येणार नाही. स्थानिक रहिवासी क्षेत्र वगळून ही कारवाई करण्यात येत असल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले.
गोडसे, जायभावेंनी लढविली खिंड
माजी खासदार गोडसे व तानाजी जायभावे हे स्थानिकांसमवेत दिवसभर ठाण मांडून होते. सायंकाळच्या सुमारास ते महिरवणीपर्यंत पायी फिरले.
गुरूवारी देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे. कारवाईतून निवासी बांधकामे तुर्तास वगळण्यात आली आहेत.सुचिता चव्हाण, तहसीलदार, एनएमआरडीए
दोनशे अतिक्रमणांवर हातोडा
एनएमआरडीएकडून कारवाईसाठी तहसीलदार सुचिता चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाशिक ते बेळगाव ढगापर्यंत ५० बांधकामे तर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्र्यंबकेश्वर ते अंजनेरीपर्यंत दिडशे बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
सणासुदीच्या तोंडावर ही अत्यंत अमानवीय कृती आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी, व्यावसायिकांच्या बाबत मानवी दृष्टिकोनातून विचार करावा ही माझी ठाम भूमिका असून त्यांच्या लढ्यात मी आहे.राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक लोकसभा
कारवाईला स्थगिती ?
दरम्यान, या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. यात, उच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. न्यायालयाचे आदेश अद्याप प्राप्त न झाल्याने त्याची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात येणार असल्याचे ॲड. तानाजी जायभावे यांनी सांगितला.