लासलगाव (नाशिक ) : दिवाळीत नाशिक विभागातील लासलगाव एसटी आगाराने अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी करत विभागात आपली छाप उमटवली. गर्दीच्या काळात योग्य नियोजन, कार्यक्षम कर्मचारी, अखंड सेवेमुळे आगाराने यंदा विक्रमी उत्पन्न मिळवले.
दि. २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत आगाराने दैनंदिन ४४ बस फेऱ्यांद्वारे एकूण एक लाख २२ हजार ४७५ किलोमीटर अंतर पूर्ण केले. या काळात दैनंदिन सरासरी १६ हजार ५०० प्रवाशांची वाहतूक केली. एकूण ८१ लाख ८१ हजार ३३० रुपये उत्पन्न मिळवले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १५ लाख रुपयांनी अधिक उत्पन्नाची नोंद झाली. ही कामगिरी करण्यासाठी आगार व्यवस्थापिका सविता काळे यांनी विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन केले.
कार्यशाळा अधीक्षक मनोज भोई यांनी मार्गस्थ बिघाडाचे प्रमाण शून्यावर आणत बस वेळेत उपलब्ध करून दिल्या. वाहतूक निरीक्षक रोहित सानप, वाहतूक नियंत्रक बोठे, मथुरे, गवळी, लाड आणि त्यांच्या टीमने प्रवासी वाहतुकीचे नियोजन करत उत्पन्नवाढीला हातभार लावला. यात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा विशेष वाटा राहिला. त्यांनी स्वतःचा दिवाळीचा सण प्रवाशांच्या सेवेत घालवून सार्वजनिक सेवा हीच खरी पूजा हे ब्रीद प्रत्यक्षात आणून दाखवले.