उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Nashik : सिंहस्थाच्या नियोजन बैठकीबाबत साधू-महंतांमध्ये नाराजी

गणेश सोनवणे

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थाच्या प्राथमिक बैठकीच्या नियोजनाबाबत साधु महंतांमध्ये नाराजी असून आनंद आखाडयाचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावत नगरपालिका प्रशासन मूलभूत सुविधांबाबत लक्ष देत नाही, असा आरोप केला. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टिकास्त्र सोडत पालकमंत्र्यांना ञ्यंबकेश्वर येथे सिंहस्थ होतो याचा विसर पडला आहे का? असा प्रश्न विचारला. सरकार आणि जनता यांच्यातील पालकमंत्री दुवा असतो यावर त्यांनी बोट ठेवले. सोमवारच्या बैठकीला पालक मंत्री यांना बोलवायला हवे होते असेही ते म्हणाले.

अटल आखाडयाचे महंत उदयगिरी महाराज यांनीही सिंहस्थ बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली. सोमवारी ते बैठकीला गेले नाहीत अथवा त्यांनी त्यांच्या आखाडयाचा एकही प्रतिनिधीही पाठवला नाही. बैठकीच्या आयोजनाबाबत त्यांचा आक्षेप होता. केवळ एका आखाडयाच्या सांगण्यावरून बैठक आयोजीत केली याबाबत नगर पालिका प्रशासनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या बैठकीस जिल्हाधिकारी अथवा तत्सम दर्जाचे प्रशासकीय अधिकारी असते तर बैठकीला काही अर्थ उरतो, असे परखड शब्दांत सुनावले. त्यातही समस्या अथवा मागण्या मांडल्यानंतर त्यांचा विचार नगरपालिका प्रशासन करत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

श्रीराम शक्तीपिठाचे संस्थापक, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांना तर निमंत्रणच दिलेले नव्हते. निरंजनी आखाडयाचे महामंडलेश्वर असलेले सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा मोठा भक्त परिवार आहे. गत सिंहस्थात त्यांचे मोठे योगदान राहीले आहे. अन्य ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळयात त्यांचा सहभाग असतो. मात्र त्यांना निमंत्रण देण्याचा नगर पालिका प्रशासनला विसर पडला. याबाबत त्यांच्या शिष्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

ञ्यंबकेश्वर येथे साधुंचे दहा आखाडे आहेत. सिंहस्थामध्ये सर्वांचा सहभाग असतो. प्रत्येक आखाडयाच्या काही समस्या आहेत. सोमवारच्या बैठकीत प्रशासनाला साधुंनी अस्वच्छता, अतिक्रमण याबाबत धारेवर धरले, मात्र चार दिवस उलटले तरीही याबाबत कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. याबाबत काही साधु-महंत लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. नगर पालिका प्रशासनाची शहरातील अतिक्रमण, अस्वच्छता व मूलभूत सुविधांकडे झालेले दुर्लक्ष जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT