Jalgaon Crime: जळगावात गुन्ह्यांची मालिका : पैशाच्या वादातून महिलेवर चाकू हल्ला, दुसऱ्या घटनेत तरूणावर ब्लेडने वार Pudhari
जळगाव

Jalgaon Crime: जळगावात गुन्ह्यांची मालिका : पैशाच्या वादातून महिलेवर चाकू हल्ला, दुसऱ्या घटनेत तरूणावर ब्लेडने वार

भुसावळ बसस्थानकात सैनिकाने फोडल्या बसच्या काचा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: दिवाळीसाठी पैसे द्या, असे म्हणत घरात जबरदस्तीने शिरलेल्या व्यक्तीने आरोही इंद्रकुमार ललवाणी (३८, रा. बालाजी हाईटस्, मोहाडी रोड) या महिलेवर चाकूने वार केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला करणारा गोकूळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) हा पूर्वी या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करीत होता. ही घटना सोमवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता घडली. यावेळी मोठी गर्दी होऊन नागरिकांनी हल्ला करणाऱ्याची धुलाईदेखील केली. संशयित गोकूळ राठोड हा १३ ऑक्टोबर रोजी इमारतीमध्ये आला व आरोही ललवाणी यांच्या घरी जाऊन पिण्यासाठी त्याने पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर त्याने महिलेकडे दिवाळीसाठी पैसे व वस्तू द्या, अशी मागणी केली. पती घरी नाही, असे महिलेने सांगितले.

मात्र त्यावेळी तो घरात शिरला. त्याला बाहेर काढत असताना त्याने चाकूने महिलेच्या हाताच्या पंजावर वार केले. महिलेने धाडस दाखवून आरडाओरड केल्याने इमारतीमधील रहिवासी आले. यावेळी त्याची चांगलीच धुलाई केली. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल वाघ व त्यांचे सहकारी पोहचले. या प्रकरणी आरोही लालवाणी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोकूळ राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारदार ब्लेडने तरूणाच्या पाठीवर, पोटावर केले वार !

जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरामध्ये काहीही कारण नसताना एका तरुणाला त्याचा रस्ता अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खिशातून ब्लेडने छातीवर व पाठीवर वार करून जखमी केल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. या संदर्भात दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, संदीप पप्पू पाटील (वय २४) हा तरुण हरीविठ्ठल नगर, जळगाव येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता परिसरात राहणारा भज्या कोळी (रा. हरीविठ्ठल नगर) याने काहीही कारण नसताना संदीप पाटील यांच्या पाठीवर व पोटावर धारदार ब्लेडने वार करून त्याला गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या संदीप पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी दुपारी ३ वाजता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा भज्या कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनावणे ह्या करीत आहे.

भुसावळ बसस्थानकात सैनिकाने फोडल्या बसच्या काचा

रावेर-छत्रपती संभाजीनगर बस भुसावळ बस स्थानकावर आली असता प्रवासी मुख्य दरवाजातून बसमध्ये प्रवेश करीत होते. मात्र, एका सैनिकाने ड्रायव्हरकडील दरवाजातून चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्रायव्हरने त्याला हटकले असता त्याने बसवर दगडफेक केली.

स्वतःला सैनिक सांगणाऱ्या जालनाच्या दत्ता घोलप याने हा प्रकार केला आहे. बसमध्ये चढू न दिल्याने चक्क बस स्टँडवर उभ्या बसवर चार ते पाच वेळा दगडफेक करून समोरील काच फोडली. या घटनेमुळे बस स्थानकात एकच गोंधळ झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT