जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोने-चांदी स्वस्त झाल्यामुळे चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. सोने दहा ग्रॅममागे 721 रुपयांनी, तर चांदी किलोमागे 5,150 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी झुंबड दिसून येत आहे. सोबतच, शेअर बाजारातही दोन्ही निर्देशांक वधारल्यामुळे आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स 411 आणि निफ्टीत 133 अंकांनी वाढ झाली आहे.
शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी 2,781 रुपयांची घट झाल्याने 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख 32 हजार 355 रुपयांपर्यंत खाली आले होते. लक्ष्मीपूजनाच्या आधी सोमवारी सकाळी पुन्हा बाजार उघडताच 721 रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने एक लाख 31 हजार 634 रुपयांपर्यंत घसरले. धनत्रयोदशीच्या दिवशी 5,150 रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख 75 हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. पाठोपाठ सोमवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा 5,150 रुपयांची घट झाल्याने चांदी एक लाख 69 हजार 950 रुपयांपर्यंत खाली घसरली आहे.
बँका, आयटी, ऑईल अँड गॅस निर्देशांकात वाढ झाल्याने सलग चौथ्या सत्रात भारतीय शेअर निर्देशांकात वाढ झाली. विदेशी संस्थांसह देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीची आतषबाजी केल्याने शेअर निर्देशांकात सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सोमवारच्या (दि. 20) सत्रात सेन्सेक्स 411 आणि निफ्टीत 133 अंकांनी वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 0.49 टक्क्याने वाढून 84,363 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 0.52 टक्क्याने वाढून 25,843 अंकांवर स्थिरावला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.75 टक्क्याने आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.46 टक्क्याने वधारला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकाने सर्वाधिक 2.87 टक्क्यांनी उसळी घेतली. निफ्टी ऑटो निर्देशांक 0.16 टक्क्याने घसरला.
लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजाराला मंगळवारी (21 ऑक्टोबर) आणि बुधवारी सुट्टी असून, लक्ष्मीपूजनानिमित्त दुपारी 1 वाजून 45 मिनिट ते दुपारी 2 वाजून 45 मिनिटांपर्यंत चालेल. प्री-ओपनिंग व्यवहार दुपारी दीड ते पावणेदोन या वेळेत होतील.