पिंपळनेर,जि.धुळे : एखाद्या विद्यार्थ्याच्या अत्युच्च गुणवत्तेने भारावून त्यांनी संशोधनाचे शिक्षण घेतलेल्या कोलंबीया विद्यापीठ प्रशासनाला थेट पुतळा उभारण्यास भाग पाडते, याच्याऐवढी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट दुसरी काय असू शकते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लहू पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकतांना केले.
पिंपळनेर येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन.के.पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना व आयक्यूएसी विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लहू पवार, वरिष्ठ प्रा.डॉ.बी.सी.मोरे,आयक्यूएसी संयोजक डॉ. एस.पी.खोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एलजे गवळी, प्रा.सी.एन.घरटे, प्रा. प्रथम सूर्यवंशी, प्रा.दीपक नेरकर, दहिवेल महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक अजय मराठे, सुनील पवार, संदीप अमृतकर, रवींद्र शेलार, नरेंद्र ढोले, मिलिंद कोठावदे आदी उपस्थित होते.
प्राचार्य पवार म्हणाले की, कोलंबीया विद्यापीठात तासनतास अभ्यास करत बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र विषयात सर्वोच्च अशी पीएच.डी.पदवी मिळवली. याची दखल घेत तेथील ग्रंथालयाजवळ बाबासाहेब आंबेडकरांचा भला मोठा पुतळा उभारून त्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज हे नाव देणं आपल्यासाठी गौरवास्पद आहे.
त्यानंतर अवघ्या 65 वर्षाच्या आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात आणि देशाबाहेर अनेक नामवंत विद्यापीठांमध्ये स्वतःच्या हुशारीने अठरा अठरा तास अभ्यास करून 33 पदव्या घेतल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिश सरकारच्या काळात ते कामगार मंत्री होते. त्यानंतर 1947 ते 1951 दरम्यान बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. अशा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारास नमन करत प्राचार्य पवार यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवायोजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. लोटन गवळी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. आयक्यूएसी संयोजक डॉ. संजय खोडके यांनी आभार मानले.