देवदैठण : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा असतो. मात्र पिंप्री कोलंदर (ता. श्रीगोंदे) येथील पिंप्री चौफुला प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले. जागामालकाने शाळा भरविण्यास विरोध केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच ठिय्या मांडला.
या शाळेसाठी (कै.) भानुदास सदाशिव ओहोळ यांनी पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या मालकीची दोन गुंठे जागा बक्षीसपत्राद्वारे दिली होती. त्यामुळे गावात शाळेची उभारणी झाली. पुढे शाळेतील मूलभूत सुविधांमध्ये वाढ करताना शौचालयासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता भासली. तेव्हा ओहोळ यांचे पुत्र अविदास आणि संजय ओहोळ यांनीही स्वमालकीची आणखी जागा शाळेच्या शौचालयासाठी विनामूल्य दिली. शौचालयाच्या कामासाठी या जागेत शाळेच्या मागील बाजूस खड्डा खोदण्यात आला. त्यात पाणी साचले. काही दिवसांपूर्वी त्यात गाय पडली. त्याची दुर्गंधी सुटल्याने ओहोळ कुटुंबीयांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली. मात्र ग्रामपंचायतीकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
त्यातच सोमवारी (दि. 16) शाळेचा पहिलाच दिवस होता. विद्यार्थी शाळेत आल्यावर ओहोळ कुटुंबाने ‘शाळा आमच्या जागेवर आणि दुर्गंधीचा त्रासही आम्हालाच,’ असा त्रागा व्यक्त करत शाळा भरविण्यास विरोध दर्शवला. परिणामी संतप्त पालकांनी मुलांना घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथे ठिय्या मांडला. या वेळी सरपंचांनी पालकांची समजूत काढली व लवकरात लवकर शौचालयाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वर्ग भरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदावर मात्र यामुळे विरजण पडले.