Rahuri Nagarparishad Election Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Nagarparishad Election: राहुरीच्या राजकारणात मोठी उलथापालथ

प्रत्येक प्रभागात उगवत्या सूर्याची उत्कंठा नवे चेहरे तयारीत; हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा
  • प्रत्येक प्रभागात उगवत्या सूर्याची उत्कंठा नवे चेहरे तयारीत; हालचालींना वेग

  • राहुरीच्या राजकीय इतिहासाचा नवा अध्याय सुरु

राहुरी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती (पुरुष) आरक्षण निश्चित झाले आहे. या घोषणेमुळे राहुरी शहरातील राजकीय समीकरणात मोठी उलथा-पालथ झाली आहे. यानंतर पालिका प्रशासनाने प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करुन, निवडणुकीचे दिपावलीपूर्वीच राजकीय फटाके फोडण्यास प्रारंभ होणार असल्याचे दृश्य दिसत आहे.

बुधवारी 8 ऑक्टोबर 2025 रोजी राहुरी नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी अनुप यादव व मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. राहुरी नगरपरिषद हद्दीत एकूण 12 प्रभाग आहेत. प्रत्येकी 1 महिला, 1 पुरुष असे 24 नगरसेवक निवडले जाणार आहेत. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत प्रक्रिया पार पडली. राहुरी नगरपरिषद जिल्ह्यात राजकीयदृष्ट्‌‍या संवेदनशील मानली जाते. गेल्या काही कार्यकाळात येथे विविध गटांमध्ये निवडणूक लढविण्यात आली, मात्र सतत तनपुरे घराण्याचाच प्रभाव कायम राहिला आहे. यंदा प्रथमच नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणात मोठा बदल होणार आहे. नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आरक्षण सोडत जाहीर होताच विविध राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय समिकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे. राहुरीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडी, मनसे तसेच आरपीआय या पक्षांचा प्रभाव आहे. नगराध्यक्षपदासाठी पात्र उमेदवाराची शोधा-शोध सुरू झाली आहे.

आरक्षण सोडत प्रक्रियेवेळी निलेश जगधने म्हणाले की, राहुरीच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गाला आरक्षित झाले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीस या पदावर विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. हे फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेमुळे शक्य झाले आहे. हे पद आम्ही त्यांच्या चरणी समर्पित करतो. यावेळी दादा सोनवणे, आर. आर. तनपूरे, सूर्यकांत भूजाडी, सागर तनपूरे, अक्षय तनपूरे, राजेंद्र उंडे, नंदुभाऊ तनपूरे, विक्रम भूजाडी, गणेश खैरे, गजानन सातभाई, निलेश जगधने, अरुण साळवे, सुनिल पवार, दीपक साळवे, प्रतिक तनपूरे, आतिक बागवान, ज्ञानेश्वर जगधने, तात्यासाहेब काशीद आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदावर नुसूचित जमाती प्रवर्गाला संधी मिळाल्यामुळे राहुरीच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे. आगामी निवडणुकीत सामाजिक न्याय, तरुण नेतृत्व व विकास या मुद्यांवरचं चुरशीची लढत रंगणार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रभाग क्रमांक 1 साठी अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 साठी अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 साठी अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 4 साठी अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5 साठी अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 साठी अ अनुसूचित जमाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 साठी अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8 साठी अ अनुसूचित जमाती, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 9 साठी अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10 साठी अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11 साठी अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 साठी अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

youtube.com/watch?v=YwTWSWuhmow

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT