पुणतांबा : पुणतांबा-रस्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीमधील विविध अनियमितता व गैरव्यवहारांसह ग्रामपंचायत लेखसंहितेचे उल्लंघन करुन, अनियमिततेसह कायम, संशयित अपहार करण्यात आला आहे, असे ताशेरे चौकशी अहवालात ओढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहे. या अहवालामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल पदाधिकारी व ग्रामस्थांमधून उटल-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता व गैरव्यवहाराबाबत जनसेवा मंडळाचे ग्रामपंचायतीचे सदस्य रामचंद्र पवार यांनी तक्रार सादर केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमार्फत गेल्या महिन्यांच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या कारभाराची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, त्या चौकशीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध अनेक मुद्यांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीप्रमाणे व ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 मधील नेहमीप्रमाणे दोषींविरुद्ध कारवाही करून, गैरव्यवहार केलेली रक्कम वसूल करण्याबाबत राहाता पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पंधरावा वित्त आयोग पाणीपट्टी थकबाकीमध्ये गैरव्यवहार करुन, रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचा अजब प्रकार उघड झाला आहे. यासह तक्रारीनुसार काही चौकशींमध्ये या समितीने संबंधितांविरुद्ध ठपका ठेवला आहे. क्लोरीनेटर मशीन खरेदी, पाणी पुरवठा सहकारी मुद्यांवरील तक्रारीत तथ्य नाही, असे या अहवालात म्हटले आहे.
ग्रामनिधी, अल्पसंख्यांक विकास जिल्हा वार्षिक योजना, ठक्कर बाप्पा योजना, पंधरावा वित्त आयोग सन 2023/24 व 2024/25 या आर्थिक वर्षात शासन कपात न करता, अदा केलेल्या रकमेचा भरणा करून, संबंधितांवर ही जबाबदारी निश्चित करावी, असे आदेश चौकशी अहवालातून देण्यात आले आहेत.