पारनेर: शहरासह हंगे परिसराला वरदान असलेला हंगे तलाव यंदा झालेल्या पावसामुळे जूनमध्येच तुडुंब भरला. 1978ला तलावाचे काम झाले. त्यानंतर जूनमध्ये प्रथमच तलाव भरल्याची माहिती उपविभागीय सहायक अभियंता ऋतुजा भोसले, कालवा निरिक्षक संदीप पवार यांनी दिली आहे.
या तलावाचा एकूण साठा 64.63 दशलक्ष घनफूट, अमृत साठा 17.03 दशलक्ष घनफूट, उपयुक्त साठा 47.33 घनफूट आहे. या तलावावर अवलंबून असणार्या पिण्याच्या योजनांमध्ये पारनेर, हंगा, लोणी हवेली असून, शेतीसाठी हंगा, लोणी हवेली, वडनेर हवेली, पारनेर या भागातील शेतकरी शेतीसाठी पाणी उपसा करतात.
पारनेर शहरासह हंगे परिसर या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असतो. या तलावावर पारनेर शहरातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. जर तलाव कोरडा राहिला, तर शहराची पाणीपुरवठा योजना विस्कळित होते. त्यामुळे शहराला अन्यत्र म्हणजे मुळा धरण व इतर पाण्याचे स्रोत शोधावे लागत असतात.
मात्र, गेल्या वर्षीदेखील हंगे तलाव काठोकाठ भरल्याने शहराला पाणीटंचाईची झळ बसली नव्हती. यंदा तलावात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक होता व सध्या झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव तुडुंब भरला असून, सांडव्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी बाहेर पडत आहे. यामुळे परिसरातील व शहरातील नागरिक पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
पारनेर तालुक्यात मांडओहोळनंतर तीन नंबरचा पाणीसाठा असणारा हंगा तलाव आहे. या तलावावर हंगे परिसरातील शेती अवलंबून आहे. तलाव 100 टक्के भरल्याने परिसरातील शेतकर्यांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे.