मुंबईत मनसेचे काय करायचे ? file photo
मुंबई

मुंबईत मनसेचे काय करायचे ?

पुढारी वृत्तसेवा
नरेश कदम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील विधानसभेच्या मराठीबहुल जागांवरून भाजप आणि शिंदे गटात वाद आहे. त्याचबरोबर ज्या मराठीबहुल जागांवर मनसेचा प्रभाव आहे तेथे महायुतीचे उमेदवार उभे करायचे की नाहीत, याबाबतही महायुतीत खल सुरू आहे.

मुंबईत भाजपचे १४ आमदार आहेत, तर शिंदे गटाचे पाच आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत या जागा त्या पक्षांना जातील. याचबरोबर वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हे अजित पवार गटात आले आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला सोडली जाईल. तसेच अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गट लढवेल. तसेच मानखुर्द शिवाजीनगर ही जागा अजित पवार गट लढविणार आहे. म्हणजे किमान तीन जागा अजित पवार गटाला सुटतील.

मुंबईतील भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम, दिंडोशी, जोगेश्वरी, माहीम, शिवडी, वरळी या जागांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये खल सुरू आहे. कारण राज ठाकरे यांची मनसे यावेळी स्वतंत्र लढत आहे. मुंबईत मनसेने शिवडी, वरळी, माहीम, भांडूप, विक्रोळी या मराठीबहुल जागा लढवायचे ठरविले आहे. यात वरळी आणि शिवडी येथील उमेदवारही जाहीर केले आहेत. ठाकरे गटाला रोखण्यासाठी रणनीती या जागांवर ठाकरे गटासोबत मनसेची थेट लढत झाली तर या मतदारसंघात मनसेला अनुकूल निकाल लागू शकतात. पण शिंदे गट किंवा भाजपने आपले उमेदवार उभे केले तर मतांच्या विभागणीत ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावर चर्चा केली. शिंदे गटाची या मतदारसंघात फारशी ताकद नाही. पण भाजपची गुजराती, जैन मारवाडी मते मनसेकडे वळली तर त्यांचे उमेदवार निवडून येवू शकतील, अशी रणनीती आखली जात आहे.

भांडूपमधून अमित ठाकरे रिंगणात ?

भांडुप, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम या उपनगरातील जागा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने जिंकल्या होत्या. त्यामुळे त्या जागा ही शिंदे गटाने लढवायच्या की मनसेला पाठिंबा द्यायचा, यावर चर्चा सुरू आहे. भांडूपमधून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवर महायुतीचा उमेदवार नसेल. जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे गटाला हवी आहे. पण यावर भाजपकडून दावा केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT