ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे.  (File photo)
मुंबई

'बदलापूर घटनेचे सत्य बाहेर येण्याआधीच 'त्याचा' एन्काऊंटर!'; सुषमा अंधारेंची पोस्ट चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील (Badlapur case) आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसाकडील रिव्हॉल्व्हर हिसकावले असता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात अक्षयचा मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये एक पोलिस अधिकारीही गंभीर जखमी झाला. दरम्यान, हा प्रकार म्हणजे आत्महत्या की एन्काऊंटर, असा मुद्दा चर्चिला जात आहे. तसेच, या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत.

या घटनेवर ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी X वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ''अक्षय शिंदे हा महात्मा महापुरुष किंवा सोज्वळ माणूस नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूवर हळहळण्यात काहीच अर्थ नाही. मात्र त्याच्या एन्काऊंटरच्या निमित्ताने कायद्याची संपूर्ण प्रक्रियाच बायपास करण्याचा जो प्रयत्न झाला; त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरे कोण देणार?.'' असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

अक्षय शिंदेचा अशा प्रकारे एन्काऊंटर हे एका अर्थाने बदलापूर घटनेच्या प्रकरणातले सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपवून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

'पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा डाव तर नाही ना?'

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसमोर मृत्यू, हा शाळेच्या संचालक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा डाव तर नाही ना? असा सवालही ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.

Akshay Shinde Encounter : नेमकं काय घडलं?

ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ व्या पथकाकडे आरोपी अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, पोलिस पथक तळोजा कारागृहात धडकले आणि आरोपी अक्षय शिंदे याला घेऊन ठाण्याकडे निघाले होते. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास टोल नाक्याच्या आसपास आरोपी अक्षय शिंदे याने सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांची पिस्तूल हिसकावून घेत तीन राऊंड फायर केले. दोन फायर हवेत झाडले, तर एक गोळी मोरे यांच्या पायावर लागली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी बरोबर अक्षयच्या डोक्याला लागली. तर दुसरी अन्यत्र लागली. त्याला कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT