मुंबई : अंधेरी पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 80 मधील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन महानगरपालिका शाळेची इमारत अत्यंत जर्जर व धोकादायक स्थितीत आहे. यामुळे या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. परिणामी पालकांमध्ये भीती परसली असून या पार्श्वभूमीवर पालक, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘अंधेरी विकास समिती’ यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
येथील शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि स्थानिकांनी 19 जून रोजी माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांच्या नेतृत्वात या शाळेची पाहणी केली. यावेळी, शाळेची चार मजली इमारत लोखंडी सळ्यांवर उभी असून छतावरून प्लास्टर, लाकूड व काचांचे तुकडे अधूनमधून खाली पडत असल्याचे दिसून आले.
शाळेतील एकूण 37 वर्गखोल्यांपैकी बहुतांश खोल्या वापरण्यास बंद आहेत आणि उर्वरित खोल्याही सुरक्षित नाहीत. शौचालयांचे छप्पर व भिंतीही धोकादायक अवस्थेत आहेत. जागेअभावी काही वर्ग व्हरांड्यात घेतले जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप शांताराम पाटकर, भुजबल तिवारी, जनार्दन गौतम, उमेश उपाध्याय, संजीव सिंग, संजय बावगे, उमाकर गौतम व बाळा जाधव आदी अंधेरी विकास समितीच्या सदस्यांनी केला.