मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर येत असून बुधवारी दुपारी पंतप्रधानांचे विमान थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरेल. पंतप्रधानांच्याच हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होत असून तेथूनच ते मुंबई मेट्रो-3 च्या अंतिम टप्प्याचेही लोकार्पण करतील. गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचासह बीकेसीत जीओ सेंटरमध्ये आयोजित जागतिक फिनटेक महोत्सवात मोदी सहभागी होतील.
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन म्हणजे महामुंबईचे महाउड्डाण मानले जाते. आज घडीला देशातील सर्वांत व्यग्र म्हणजे सर्वाधिक उड्डाणांचे विमानतळ म्हणून दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्या क्रमांकावर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बुधवारी नवी मुंबई विमानतळाच्या फक्त टर्मिनल-1 चे उद्घाटन पंतप्रधान करतील आणि प्रत्यक्ष विमान वाहतूक नोव्हेंबरच्या मध्यात सुरू हाईल. त्यानंतर पाच-सात वर्षांतच मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल आणि नवी मुंबई हेच महामुंबईचे मुख्य विमानतळ म्हणून जगाच्या नकाशावर ओळखले जाईल.
पंतप्रधान मोदी बुधवारी दुपारी 3 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरताच प्रथम टर्मिनल-1ची आणि एकूणच विमानतळाची पाहणी करतील. यावेळी आणि उद्घाटन समारंभालाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच केंद्रीय मंत्री आणि राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल.
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या मुंबई मेट्रो मार्गिका -3च्या अंतिम टप्प्याचे उदघाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. मुंबईची पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका म्हणून हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात महत्त्वाचा ठरणार आहे. या सोबतच राज्यातील 419 आयटीआय आणि 141 तांत्रिक संस्थांमध्ये 2 हजार 506 बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान मोदी हे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमाराला ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचे मुंबईत स्वागत करणार आहेत. दोन्ही देशांचे पंतप्रधान दुपारी मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे ‘सीईओ फोरम’ला उपस्थित राहतील. त्यानंतर, दुपारी ते सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होतील. या महोत्सवात उभय पंतप्रधानांची मुख्य भाषणेही होणार आहेत.
स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार
या प्रकल्पामुळे रायगड, पनवेल, उरण, नेरुळ परिसरातील हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विमानतळ परिसरात रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल आणि लॉजिस्टिक हब विकसित होणार असल्याने संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची नवी ओळख
मुंबईनंतर आता नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिचय या विमानतळामुळे होणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीस नवे पंख देणार्या या प्रकल्पामुळे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीस मोठा चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिडको आणि अदानी समूह यांनी संयुक्तपणे उभारलेल्या या विमानतळाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक रचना आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांनी सजलेले आहे.
हे विमानतळ देशातील पहिले कार्बन न्यूट्रल ग्रीन एअरपोर्ट ठरेल. आतल्या भागात नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन यावर भर देण्यात आला असून सौरऊर्जेचा वीजपुरवठा, पर्जन्यजल साठवण व्यवस्था आणि हरित क्षेत्र राखून विमानतळाची रचना करण्यात आली आहे.
या विमानतळाला चार टर्मिनल असतील. तीन लाख चौरस मीटर परिसरात उभारलेल्या टर्मिनल-1 चे उद्घाटन बुधवारी होईल. या टर्मिनलवर एकावेळी 42 विमाने उभी राहितील. टर्मिनल-1 ची वार्षिक प्रवासी क्षमता 20 दशलक्ष आहे. रोज तब्बल 55 हजार उड्डाणे या टर्मिनलवरून होऊ शकतील.