महाविकास आघाडीने आतापर्यंत 262 जागांवर उमेदवार जाहीर केले  File Photo
मुंबई

उरले फक्त ४८ तास; उमेदवारीचा पेच सुटेना!

Maharashtra Assembly Election : 'मविआ' च्या 26 तर महायुतीच्या 49 उमेदवारांची घोषणा बाकी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अखेरचे 48 तास उरले असतानाही महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपले सर्व उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाविकास आघाडीतर्फे 26 जागांवर तर महायुतीतर्फे 49 जागांवर अद्याप उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत.

अपक्ष उमेदवारी, बंडखोरी, पक्षांतरे हे प्रकार टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत संवेदनशील मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा उशिरात उशिरा करण्याकडे प्रमुख राजकीय पक्षांचा कल आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रविवारी आपल्या नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही 4 उमेदवारांच्या नावासह तिसरी यादी जाहीर केली. काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर करीत 14 नावांची घोषणा केली. तसेच शिवसेना शिंदे गटाने आपली दुसरी यादी जाहीर करीत 20 नावांची घोषणा केली.

सोमवार आणि मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचे अखेरच्या दोन दिवशी राज्यभर नेत्यांचे रोड शो, उमेदवारी अर्ज भरतानाचे शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सोमवारी शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज ब्रह्मपुरी येथे दाखल करणार असून यावेळी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे उपस्थित राहणार आहेत. पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले काही नेते वंचित बहुजन, परिवर्तन महाशक्ती अशा छोट्या पक्षांच्या वळचणीला जावून किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसतील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबर ही आहे. मुदत देण्यात आली असल्याने बंडखोरी करणार्‍या नेत्यांची, अपक्ष उमेदवारांची मनधरणी करताना राज्यातील दिग्गज नेते दिसतील.

महाविकासची महायुतीवर आघाडी

महाविकास आघाडीने आतापर्यंत 262 जागांवर उमेदवार जाहीर केले असून आता केवळ 26 जागांवर उमेदवार जाहीर करायचे बाकी आहे. याउलट महायुतीने केवळ 239 जागांवरच उमेदवार जाहीर केले असून महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. महायुतीत 49 जागांवर अद्याप उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसने आतापर्यंत 101, राष्ट्रवादी शरद पवार गटाने 76 तर शिवसेना ठाकरे गटाने 85 असे एकूण 260 उमेदवार जाहीर केले आहेत. आतापर्यंत भाजपने 121 उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच शिवसेना (शिंदे) 65 व राष्ट्रवादी अजित पवार गटाने 49 उमेदवार जाहीर केले असून महायुतीने 239 उमेदवार जाहीर केले आहेत.

मविआत मैत्रीपूर्ण लढती शक्य

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत काही जागांवर मतभेद असल्याची माहिती आहे. मुंबईत 4 ते 5 जागांवर आणि राज्यात 7 ते 8 जागा अशा 10 ते 12 जागांवर काँग्रेसला विश्वासात न घेताच शिवसेनेने एबी फॉर्म वाटल्याची काँग्रेसची तक्रार आहे. या जागांवरून दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेले आहेत. हा वाद न सुटल्यास 10 ते 12 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT