मुंबई : दिवाळीसाठी महामुंबईतील बाजारपेठा गेली आठवडाभर गजबजल्या आहेत. मात्र बुधवार व गुरुवारी सायंकाळी अचानक होत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे दिवाळं निघाले. त्याच्या मालाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
दादरसह मुंबईतील अन्य मोठ्या मार्केटमध्ये दिवाळीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिवाळी साहित्याची विक्री होते. मोठ्या मार्केटच्या पदपथावर या विक्रेत्यांनी आकाश कंदील विक्रेत्यांसह पणत्या, रांगोळीसह रांगोळीचे कलर, विविध शोभिवंत पताका, अन्य वस्तूंची दुकाने थाटली होती. मात्र बुधवाररी व गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे या विक्रेत्यांची एकच तारांबळ उडाली. कागदाचे आकाश कंदीलही खराब झाले. अन्य साहित्यही पावसामध्ये भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दिवाळीचे साहित्य विकणाऱ्यांमध्ये बेरोजगार तरुणांसह ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला, व अन्य व्यापाऱ्यांचा समावेश आहे. दिवाळीतील हा धंदा जेमतेम महिनाभर चालतो. या महिनाभरात बेरोजगार व गरजूंना मोठा आर्थिक फायदा मिळतो. मात्र पावसाने या विक्रेत्यांच्या पोटावर पाय आणले आहेत.
धंद्याच्या वेळेतच विघ्न
दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी अनेकजण सायंकाळी आपले कार्यालय सुटल्यानंतर दादर येथे येतात. पण सायंकाळी पावसाला सुरुवात होत असल्यामुळे थेट आपल्या घरी निघून जातात. त्यामुळे बुधवारपासून सायंकाळी साहित्याच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. सायंकाळी होणारी गर्दी आता कमी झाली आहे. त्यामुळे याचा थेट फटका सणासुदीला व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना बसला असल्याचे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले.