मुंबई शहर आणि उपनगरात अनेक झोपडपट्ट्या अशा आहेत, ज्या डोंगरावर किंवा डोंगर उतारावर वसल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुलुंड पश्चिमेकडील पंचशील नगर. एक दरडप्रवण क्षेत्र.महापालिकेने घोषित केलेल्या संवेदनशील दरडप्रवण ठिकाणांमध्ये पंचशील नगरचा सामावेश आहे.
पंचशील नगर येथील झोपड्या काही कच्च्या तर काही पक्क्या बांधकाम केलेल्या आहेत. हजारो लोकांनी येथील झोपड्यांमध्ये संसार थाटले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे येथील डोंगर भागातील माती आणि दगड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. यासाठी पालिकेतर्फे एप्रिल मे महिन्याच्या सुरुवातीलाच या भागातील झोपड्यांवर ‘सदर ठिकाण धोक्याचे आहे, तातडीने स्थलांतर करावे’, अशी नोटीस महापालिकेचे अधिकारी चिकटवून जातात.
पंचशीलनगर या दरडप्रवण क्षेत्रात राहणार्या नागरिकांना विविध अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागतो. दरडप्रवण क्षेत्रात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो. माती सरकणे, दगड कोसळणे, भिंती पडणे यासारख्या घटना घडतात. त्यामुळे जिवीतहानी व मालमत्तेच्या नुकसानीचा धोका अधिक असतो. येथील बहुतेक घरे ही झोपडपट्टी स्वरूपाची आहेत. त्यामुळे या घरात पावसाळ्यात पाणी गळती व पडझड होण्याची शक्यता अधिक असते.
येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. योग्य ड्रेनेज सिस्टीम नाही. अरुंद आणि खराब रस्ते. त्यामुळे रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहनांना प्रवेश मिळणे अशक्यच. आरोग्याच्या समस्या, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव, वीज व शौचालय सुविधांचा अभाव यासारख्या समस्यांचा येथील रहिवाशांना रोजच सामना करावा लागतो.
तातडीने स्थलांतरित करावे, अशी नोटीस आमच्या झोपड्यांवर प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका अधिकारी चिकटवून जातात. परंतु कायमस्वरूपी उपाययोजना मात्र करत नाहीत. दुर्घटना घडली तरच प्रशासनाला जाग येते. इतर वेळी या समस्येकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, असे येथील स्थानिक रहिवासी निवृत्ती वाबळे यांनी सांगितले.
दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मजबूत रिटेनिंग वॉल्स उभारण्याची आवश्यकता आहे.
जिथे भिंती तुटल्या आहेत, तिथे तात्काळ दुरुस्ती करून मातीचा निचरा आणि नालेसफाई योग्य पद्धतीने व्हावी.
डोंगर उतारावरून पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज यंत्रणा तयार करावी.
डोंगर उताराची माती किती ठिसूळ आहे, हे जाणून घेण्यासाठी जिओ टेक इंजिनीयरिंग चाचणी करावी.
धोका वाढलेला भाग रिकामा करावा.
पावसाळ्यात या परिसरात एनडीआरएफ व पालिकेची टीम सज्ज ठेवावी.
पंचशील नगरात डोंगर उतारावरील झोपड्यांना दरडींचा धोका आहे आणि प्रशासनाकडून यावर उपाययोजना सुरू आहेत. राज्य शासनाने 1995-96 पासून संरक्षक भिंत बांधकाम कार्यक्रम कार्यान्वित केला आहे, जेणेकरून डोंगर उतारावरील दरडी कोसळून होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. म्हाडा व पालिकेद्वारे या संरक्षक भिंतींची कामे केली जात आहेत. काही ठिकाणी प्रस्तावित आहेत. येथे काही ठिकाणी भिंती, तर काही ठिकाणी डोंगर उतारावर संरक्षक जाळी बसवण्याचे काम चालू आहे, असे पालिकेच्या टी वॉर्डमधील एका अधिकार्याने सांगितले.
पावसाळ्यात येथील डोंगर उतारावरील झोपड्यांवर दरडी कोसळण्याची भीती असते. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेकदा विषय मांडून येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु येणार्या लोकांना, लोकप्रतिनिधी थातुरमातुर उत्तरे देतात. परंतु काहीच करत नाहीत.विकास छतवाणी, स्थानिक रहिवासी
येथील रहिवाशांकडे पर्यायी जागा नसल्याने ते जीव मुठीत घेऊन राहतात. घर खाली केल्यास घराला कायमचे मुकावे लागेल,अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे ते दुसरीकडे जायचा विचारही करत नाहीत.आनंद पवार,सामाजिक कार्यकर्ते.