६५ पार... तरीही नोकरीची संधी! आता महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी भरती  AI Photo
मुंबई

६५ पार... तरीही सरकारी नोकरीची संधी! आता महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी भरती

BMC recruitment 2025 | २५ एप्रिल अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नोकरीसाठी वयाची ठरावीक मर्यादा असते. पण मुंबई महापालिकेत चक्क ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वयाची मर्यादा ६५ ते ७० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारी-निमसरकारी कार्यालय, बँक व अन्य कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करण्यात येते. केंद्र सरकारची ही मर्यादा ६० वर्षे इतकी आहे. पण मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ६५ ते ७० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची वयोमर्यादा ओलांडून गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरी करता येणार आहे. या भरतीमध्ये जिल्हा क्षयरोग केंद्रांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याशिवाय अन्य ३७ पदे भरली जाणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली असून त्यांना मासिक ६० हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची वयोमर्यादा ६५ वर्षे असून त्यांना मासिक १७ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. टीबी हेल्थ व्हिजिटर १६ पदे भरण्यात येणार असून त्यांना मासिक वेतन १५ हजार ५०० रुपये त्याशिवाय १ हजार ५०० वाहतूक भत्ता मिळेल. वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आठ पदे असून त्यांना २५ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. वयोमर्यादा ६५ वर्षे ठेवण्यात आली आहे. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ही पाच पदे असून त्यांना प्रत्येकी २० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. यासाठी वयोमर्यादा ६५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ हे पद भरण्यात येणार असून यासाठी ७५ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे.

२५ एप्रिल अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

या भरतीसाठी २५ एप्रिल अर्ज करण्याची अंतिम मुदत देण्यात आली असून ही पदे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. उमेदवारांनी आपले अर्ज मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊससमोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकळी येथे जमा करावेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT