मालाड पूर्व द्रुतगती महामार्गावर साईबाबा मंदिरजवळ शिवशाही चायचा स्टॉल लावणारे कल्पेश चव्हाण यांनी रागाच्या भरात एका कुत्र्याच्या अंगावर गरम पाणी टाकले. त्यामुळे अंगाची लाही लाही झाल्याने कुत्रा केकाटत जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. यावर नागरिक लगेचच या कुत्र्याला पशु दवाखान्यात घेऊन गेले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आला.
हृदय हेलवणारी ही घटना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता घडली. दुकानाबाहेर बसलेल्या कुत्र्याच्या अंगावर काही कारण नसताना कल्पेश चव्हाणने गरम पाणी टाकले. त्यामुळे कुत्रा मोठ्या प्रमाणात भाजला गेला. यावर स्थानिकांनी कुत्र्याला जवळच्या पशु दवाखान्यात नेले. काही लोकांना राग आल्याने कल्पेश चव्हाणला चांगलाच प्रसाद दिला. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कल्पेश चव्हाणने कुत्र्याच्या अंगावर गरम पाणी टाकल्याची घटना आणि स्थानिकांनी त्याला चोप दिल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कल्पेश चव्हाण हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मालाड पूर्व विभागातील उपशाखाप्रमुख असून त्याचा अनधिकृत शिवशाही चायचा स्टॉल आहे. त्याने अशा प्रकारे प्राण्याला त्रास देणे चुकीचे असल्याचे सांगून सर्वांची माफी मागितली आहे.तसेच कुत्र्यावर दवाखान्यात येणारा खर्च देण्याचेही त्याने मान्य केले आहे.
शिवशाही चहाचा स्टॉल अनधिकृत असतानाही महापालिका त्यावर कारवाई करत नसल्याने शिंदे शिवसेना गटाचे हेल्पलाइन पदाधिकारी मिथुन सिंह यांनी कार्यकर्त्यांबरोबर जावून चहाचा स्टॉल स्वतः हटवला. आ. सुनील प्रभू यांनी अशा विकृत माणसाला उपशाखाप्रमुख पदावरून काढून का टाकत नाही? ज्याप्रमाणे कुत्र्याच्या अंगावर गरम पाणी टाकले तसेच नागरिकाच्या अंगावर गरम पाणी टाकल्यावर त्याला उपशाखा प्रमुख पदावरून काढून टाकणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
25 जून रोजी कुत्रा माझ्या दुकानासमोर बसला असताना कळत नकळत रागाच्या भरात मी गरम पाणी त्याच्या अंगावर टाकले ही माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. याबद्दल सर्वांची माफी मागून दवाखान्यात कुत्र्यावर होणारा पूर्ण खर्च मी देणार आहे.कल्पेश चव्हाण उपशाखाप्रमुख