हिंदमाता येथे पावसाळ्यात तुंबणार्‍या पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या डिझेल जनरेटरमुळे परिसरात हवेचे प्रदूषण वाढले आहे. pudhari photo
मुंबई

Urban air pollution: डिझेल जनरेटरमुळे हिंदमाता परिसराचा श्वास कोंडला

हवेच्या प्रदूषणामुळे अंधार, नागरिकांचे आरोग्यही धोक्यात

पुढारी वृत्तसेवा
मुंबई : राजेश सावंत

हिंदमाता येथे पावसाळ्यात तुंबणार्‍या पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या डिझेल जनरेटरमुळे परिसरात हवेचे प्रदूषण वाढले आहे. जनरेटरमधून निघणार्‍या धुरामुळे हिंदमाता परिसराचा श्वास कोंडल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईकर अगोदरच वाढत्या वाहनांच्या प्रदूषणामुळे त्रस्त असताना डिझेल जनरेटरमुळे गेल्या 20 वर्षांपासून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पावसाळ्यात दरवर्षी हिंदमाता परिसरात पाणी तुंबते. तुंबणार्‍या पाण्यावर उपाय म्हणून येथे भूमिगत टाक्यांसह पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. पंपिंग स्टेशनमुळे तुंबणार्‍या पाण्याचा निचरा होतोय पण अनेकदा मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. यासाठी 2005 पासून मुसळधार पावसात पंपिंगटेशन सुरू ठेवण्यासाठी डिझेल जनरेटर वापर केला जात आहे. डिझेल जनरेटर वापरल्यामुळे हवा आणि इंधनाचे मिश्रण होते. त्यामुळे वातावरणात काळा धूर दिसून येतो. याबाबत अनेक तक्रारी करूनही गेल्या 20 वर्षात हा परिसर प्रदूषण मुक्त करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, डिझेल जनरेटरमुळे हिंदमाता परिसरात प्रदूषण होत असल्याचे पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने मान्य केले आहे. जनरेटरमधून धूर बाहेर फेकला जात असून तो आजूबाजूच्या परिसरात पसरतो. त्यामुळे संपूर्ण परिसरात काळाकुट्ट अंधार पसरलेला दिसून येतो, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

विजेचा पर्याय शोधा

डिझेल जनरेटरमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अन्य विजेचा पर्याय शोधण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी हिंदमाता व नायगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. डिझेल जनरेटर ऐवजी विजेवर पंपिंग स्टेशन चालवण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कॉम्पॅक्ट सबस्टेशन उभारणार!

हिंदमाता परिसरात पाणी तुंबत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. हिंदमाता येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत वीज पुरवठा व्यवस्था व वॉटरप्रूफ कनेक्शन असलेले पुरेशा क्षमतेचे कॉम्पॅक्ट सबस्टेशनची उभारणी करण्यात येणार असून यासाठी 3 कोटी 38 लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT