मुंबई ः शालेय शिक्षणात पहिल्या इयत्तेपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने तिसर्या भाषेचा शासन निर्णय रद्द केल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) नव्या शैक्षणिक वर्षासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकासह विषयनिहाय तासिकांची विभागणी जाहीर केली असून, त्यातूनही तिसरी भाषा हद्दपार झाली आहे. तिसर्या भाषेच्या समावेशानंतर कमी केलेला कला, क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळ आता वाढवण्यात आला आहे. शाळांनी तातडीने नवे विषयनिहाय तासिका वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश दिले आहेत.
शालेय शिक्षण विभागाने हिंदी ही सर्वसाधारण भाषा असून, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवल्या जातील, असा निर्णय जाहीर केला. यानंतर ‘एससीईआरटी’ने तिसर्या भाषेसह नवीन वेळापत्रकही जाहीर केले. तिसर्या भाषेच्या सक्तीवरून विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिसर्या भाषेसंदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द केला. त्यानंतर आता गुरुवारी ‘एससीईआरटी’ने जुने वेळापत्रक रद्द करत सुधारित वेळापत्रक जाहीर केलेे. इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषयनिहाय वेळेचे नियोजन केले आहे. तासिकांमधून तिसरी भाषा संपूर्णपणे वगळण्यात आली आहे. या तिसर्या भाषेच्या आठवड्यातील पाच तासिकांसाठी वर्ग केलेला आठवड्यातील 2 तास 55 मिनिटांचा वेळ प्रथम भाषा, कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या तासिकांमध्ये वाढवण्यात आला आहे. 35 मिनिटांच्या 3 तासिकांमध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव असे उपक्रम घेता येणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे 8 मार्च 2024 च्या शासन आदेशानुसार सक्तीचे झाले आहे. राज्यातील सर्व शाळांत यासंबंधीचा आदेश अंमलात आला आहे. हिंदी सक्तीची करण्याचा आदेश रद्द करणारा जीआर गुरुवारी काढला गेला. मराठी शिकवणे राज्यात बंधनकारक झाले असताना, आता या विषयाचे राजकारण का होते आहे, असा प्रश्न केला जातो आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील मराठी भाषा धोरण समितीने केलेल्या शिफारशीनुसार मराठी शिकवणे सक्तीचे आहे.