मुंबई : अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावर (लिंक रोड) महारेलच्या माध्यमातून घाटकोपर येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम विना अडथळा पूर्ण व्हावे यासाठी अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच हा पूल अवजड वाहनांसाठी बंद होणार आहे.
मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन (महारेल) यांच्यावतीने अंधेरी-घाटकोपर जोड मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. रेल्वेमार्गावर उभारण्यात येणार्या या पुलाचे काम महारेल करत असून पालिका अर्थसहाय्य करत आहे. केबलस्टेड रचना आधारीत असलेल्या या पुलाचे बांधकाम दोन टप्प्यात केले जाणार असून या कामाची महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली. पूल पूर्ण झाल्यानंतर परिसरात होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे टळणार असून प्रवासही सुरक्षित व जलद होणार आहे. पुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, असे निर्देशावेळी आयुक्तांनी दिले.
बांधकामांची ठोस कालमर्यादा निश्चित करावी. रस्ता रूंदीकरण, पूल प्रकल्पामुळे बाधित होणार्या पात्र निवासी व अनिवासी बाधितांचे पुनर्वसन करण्यात यावे, विविध उपयोगिता वाहिन्यांचे नियोजनपूर्वक स्थलांतरण करावे, रेल्वे मार्गावरील अस्तित्वातील पुलाचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून अवजड वाहनांना या पुलावर मनाई करावी, नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.