नवी मुंबई : राजेंद्र पाटील
दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेल्या सोन्याचा दर लक्ष्मीपूजनानंतरच्या चार दिवसांत तोळ्यामागे 8 हजार रुपयांनी घसरला, तर चांदीच्या दरात किलोमागे 38 हजार रुपयांची घट झाली. गेल्या आठ दिवसांत राज्यात 1700 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी करण्यात आली. त्यात मुंबईचा वाटा 1100 कोटींचा होता.
मुंबई, नाशिक, जळगाव, पुण्यासह राज्यात अंदाजे 460 टन तर एकट्या मुंबईत सर्वाधिक 320 टन सोन्याची विक्री झाली. गेल्या वर्षीपेक्षा सोन्याचा दर दुप्पट असतानाही यावर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
नरकचतुर्दशीला सोने 1 लाख 31 हजार रुपये प्रतितोळ्याने विकले गेल, तर चांदीचा किलोमागे दर 1 लाख 91 हजार रुपये होता. दिवाळीनंतर चार दिवसांत म्हणजे शनिवारी सोने प्रतितोळा 1 लाख 23 हजार रुपये, तर चांदी 1 लाख 53 हजार रुपये किलोपर्यंत घसरली, अशी माहिती जळगाव सुवर्णनगरीतील आर.सी.बाफना ज्वेलर्सचे मालक सुशील बाफना यांनी दिली. तर दरामध्ये चढउतार असतानाही शनिवारी बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी राज्यभरात गर्दी उसळली होती, असे इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले.
दिवाळीत दररोज मुंबईत
सरासरी 80 टन सोन्याची विक्री झाली. शनिवारी मुंबईत सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 1 लाख 25 हजार रुपये होता. तर चांदी 1 लाख 51 हजार रुपये किलो होती. मुंबईत शनिवारी चांदी 4 हजार रुपये, तर सोने 1800 रुपयांनी कमी झाले होते, अशी माहितीही कुमार जैन यांनी दिली.
धनत्रयोदशीपासून सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात दररोज वाढ होत होती. नरकचतुर्दशीला सोने 1 लाख 31 हजार रुपये तोळा होते, तर चांदी 1 लाख 60 हजार रुपये किलो होती. लक्ष्मीपूजनादिवशी सोने प्रतितोळा 3 हजार, तर चांदी किलोमागे 5 हजार रुपयांनी घसरली. यामुळे पुण्यासह जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगरमध्ये सोने 1 लाख 28 हजार रुपये तोळा, तर चांदीला 1 लाख 55 हजार रुपये किलोचा दर होता.