मुंबई : गेल्या अडीच वर्षांत झालेल्या वीज खरेदी करारांमुळे खर्चात तब्बल 66 हजार कोटींची बचत होणार असल्यामुळे पुढील पाच वर्षांनंतरही वीजदर आणखी कमी होतील, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणचा वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मान्य केला. या पार्श्वभूमीवर लोकेश चंद्र बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याची आगामी काळातील विजेची गरज लक्षात घेऊन महावितरणने 2034 -35 या आर्थिक वर्षापर्यंत पुरेशा विजेचे नियोजन केले आहे. आगामी पाच वर्षांत राज्याची विजेची क्षमता 45 हजार मेगावॅटने वाढविण्यासाठी वीजखरेदी करार केले आहेत.यामध्ये प्रामुख्याने सौर, पवन, पंप स्टोरेज,बॅटरी स्टोरेज अशा नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर दिला आहे. या स्रोतांमधून वीज स्वस्त दरात मिळणार आहे.
नवीकरणीय ऊर्जेवर भर दिल्यामुळे वीजखरेदीत बचत होण्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या गेमचेंजर योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. शेतकर्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज देण्यासाठीच्या या 16 हजार मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पातून सरासरी तीन रुपये प्रतियुनिट इतक्या कमी दरात वीज उपलब्ध होणार आहे, असे लोकेश चंद्र म्हणाले.
नवीकरणीय ऊर्जेवर भर दिल्यामुळे मिळणार्या विजेचे दर सौरऊर्जेच्या बाबतीत आगामी 25 वर्षे, तर पंप स्टोरेजच्या बाबतीत 40 वर्षे बदलणार नाहीत. स्वस्त व स्थिर दराची वीज मिळाल्यामुळे भविष्यकाळात पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होऊ शकते. राज्यातील घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचे वीजदर आगामी पाच वर्षांत वाढणार नाहीत, तर कमीच होत जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात उद्योगांसाठीचे वीजदर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत, अशी तक्रार करण्यात येत असली तरी त्यात तथ्य नाही. राज्यात उद्योगांना वीजदराबाबत मिळणार्या सवलतींचा विचार केला तर सध्याच हे दर स्पर्धात्मक आहेत. तसेच वीजदर कपातीचा निर्णय झाला आहे. आगामी पाच वर्षांत राज्यातील उद्योगांचे वीजदर आणखी कमी होत जातील आणि ते गुजरात, तामिळनाडू अशा औद्योगिक मागणी जास्त असलेल्या राज्यांपेक्षा कमी होतील, असेही लोकेशचंद्र यांनी स्पष्ट केले. महावितरणचे संचालक (संचलन) सचिन तालेवार, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदीप दिघे व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यावेळी उपस्थित होते.
स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या वीजवापरासाठी 80 पैसे प्रतियुनिट जास्तीची सवलत देण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. त्याबद्दल लोकेश चंद्र म्हणाले, ही सवलत कायम राहणार आहे. स्मार्ट मीटर हे ग्राहकांना अचूक वीजबिल उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांचा वीजवापर नियमितपणे कळविण्यासाठी आहेत. तसेच राज्यात जेथे स्मार्ट मीटर लावले आहेत, तेथे वीजबिलाबद्दलच्या तक्रारी जवळजवळ शून्यावर आल्या आहेत.