मुंबई : दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून हृदय आणि डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला मुंबईकरांना तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. फटाक्यांच्या प्रदुषणामुळे दिवाळीत हृदयरोगाचे रुग्ण वाढतात, तर दम्याच्या रुग्णांचेही प्रमाण वाढते. त्यामुळे फटाक्यांच्या प्रदुषणापासून बचाव कण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पवन कुमार म्हणाले की, दरवर्षी दिवाळीच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे हृदयरोग्यांच्या संख्येत २० ते २५ टक्के वाढ होते. कधीकधी या काळात हृदयविकाराच्या घटनांमध्येही वाढ होते. जेजे हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. प्रीती मेश्राम यांनी श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना सल्ला दिला. त्यांनी मुले आणि गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला, तसेच त्यांनी फटाके वाजवणे टाळावे, असेही डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
फटाके फोडताना संरक्षक चष्माचा वापर करा !
फटाके फोडताना नेहमीच डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. शशी कपूर यांनी दिला आहे. जवळून फटाके फोडत असाल तर संरक्षणासाठी संरक्षक चष्मा वापरा. शिवाय, फटाक्यांच्या प्रदूषणाच्या वातावरणात, दर तासाला डोळे धुण्याचा सल्लाही त्यांनी दिला. फटाके फोडताना फटाक्याचा कोणताही तुकडा डोळ्यांत गेला तर तो तपासण्यासाठी दुसरा डोळा बंद करा. जर दोन्ही डोळ्यात दृष्टी कमी झाली असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. कपूर यांनी सांगितले.