मुंबई : चुनाभट्टी रेल्वे फाटक येथे उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाच्या खर्चाबाबत मुंबई महापालिकेने तज्ञांमार्फत अभ्यास करून पुलाच्या खर्चाचे अंदाजपत्र तयार केले. या उड्डाणपुलाचे काम मिळवण्यासाठी कंत्राटदाराने अंदाजपत्रापेक्षा चक्क्क 15 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उड्डाणपूल असो अथवा रस्ता हे काम देण्यापूर्वी त्याच्या खर्चाचे अंदाजपत्र तज्ञ अधिकार्यांमार्फत तयार करण्यात येते. त्यानुसार चुनाभट्टी उड्डाणपुलासाठी येणार्या खर्चाचे अंदाजपत्र तयार करण्यात आले. या अंदाजपत्रात उड्डाणपुलासाठी 37 कोटी 41 लाख 15 हजार 519 रुपये खर्च येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याच अंदाज पत्रानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. यात चार कंत्राटदार अंतिम यादीत पात्र ठरले. पण चार पैकी तीन कंत्राटदारांनी अंदाजपत्रापेक्षा 2 ते 13 टक्केपर्यंत कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली. परंतु चौथ्या कंत्राटदाराने 15 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवल्यामुळे महापालिकेने या कंत्राटदाराला उड्डाणपुलाचे काम देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या उड्डाणपुलाला 37 कोटी रुपये खर्च येईल असे अपेक्षित धरले होते. तो उड्डाणपूल 31 कोटी रुपयामध्ये होणार आहे. यातून महापालिकेचे 6 कोटी रुपये वाचणार असले तरी उड्डाणपुलाच्या दर्जाचे काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
कंत्राटदाराला एवढ्या कमी दरात उड्डाणपुलाचे काम कसे परवडणार, जर कंत्राटदाराला हे काम परवडणार असेल तर महापालिकेच्या खर्चाचा अंदाज कुठे चुकला, असा सवालही उपस्थित होत आहे.
चुनाभट्टी उड्डाणपुलाचे काम दर्जात्मकच
मुंबई महानगरपालिकेच्या अंदाजपत्रापेक्षा कमी दराने कंत्राटदाराने काम करण्याची तयारी दर्शवली असली तरी या कामावर मुंबई महापालिकेच्या पूल विभागातील अभियंत्यांचे लक्ष राहणार आहे. पुलाचे काम सुरू असताना स्वतः अभियंते कामाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे पुलाचे काम दर्जात्मकच असेल, असे पुल विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी स्पष्ट केले.
कंत्राटदारांनी कोट केलेले दर
साई प्रोजेक्टस (-)15 टक्के - 31 कोटी 79 लाख
आर. के. मधानी (-) 13 टक्के 32 कोटी 30 लाख
श्री मंगलम बिल्डकॉन (-) 8 टक्के - 34 कोटी 38 लाख
विजया इन्फ्रा प्रोजेक्टस (-) 2 टक्के - 36 कोटी 62 लाख