मुंबई : मुंबई अग्निशमन दलाचे पक्षी व प्राण्यांचा जीव वाचवण्याचे काम वाढले असून गेल्या वर्षभरात पक्षी व प्राणी यांची सुटका करण्यासाठी विविध अग्निशमन केंद्रांमध्ये 5 हजारपेक्षा जास्त कॉल आले. 10 ते 15 वर्षांपूर्वी वर्षभरात जेमतेम 500 ते 600 कॉल येत होते.
मुंबई शहरात पक्षी व प्राणी मित्रांची संख्या वाढत असल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांपासून झाड व विद्युत केबलवर अडकलेल्या पक्ष्यांना तर नाले व गटारात पडलेल्या प्राण्यांची सुटका करण्यासाठी दररोज शेकडो फोन येतात. त्यामुळे अग्निशमन दलाला पक्षी व प्राणी वाचवण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावावी लागत आहे.
कॉल आल्यानंतर अग्निशमन दलाची एक गाडी किमान चार ते पाच जवानांसह घटनास्थळी पोहचते. विद्युत केबल व झाडावर अडकलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. पक्ष्याला वाचवण्यासाठी शिडीवर चढून काठीचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे तोल जाऊन अग्निशमन जवान पडण्याची शक्यता असते. यासाठी पालिकेने 2018 मध्ये बर्ड रेसक्यु टेलिस्कोपीक रॉड खरेदी केले होते.
अग्निशमनकडे असलेले अनेक रॉड निकामी असून सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना पूर्वीप्रमाणे काठीनेच पक्षांना वाचवावे लागत आहे. त्यामुळे नवीन रॉड खरेदी करण्यासाठी अग्निशमन दलाने पालिका प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार 57 बर्ड रेसक्यू टेलिस्कोपीक रॉड खरेदी करण्यात येणार असून यासाठी 2 कोटी 15 लाख रुपये खर्च येणार आहे.
टेलिस्कोपिक पद्धतीने बंद होणारे, कमी वजनाचे, 16 फूट उंचीपर्यंत पोहोचणारे बर्ड रेसक्यू टेलिस्कोपीक रॉड अग्निशमन दलाच्या 35 केंद्रांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून महिन्याभरात हे रॉड उपलब्ध होणार आहेत.
मुंबईतील नागरिकांच्या जिविताचे व संपत्तीचे आगीपासून व अन्य दुर्घटनेपासून संरक्षण करण्याचे बंधनकारक कर्तव्य अग्निशमन दलामार्फत पार पाडले जाते. मुंबई व उपनगरात दरवर्षी 15 हजारापेक्षा जास्त आपत्कालीन परिस्थितीचा अग्निशमन दलाचे जवान सामना करतात. यामध्ये आग लागणे, अपघात, झाड पडणे, बूडणे, रसायानांची गळती, तेल सांडणे, घर कोसळणे आदी दुर्घटनांचा समावेश असतो. त्यात आता पक्षी व प्राण्यांना वाचवण्याचे काम वाढले आहे. शहरात दररोज किमान 10 ते 12 कॉल पक्षी व प्राणी वाचवण्यासाठी येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.