मुंबई : राज्यातील कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद न करता सुरूच ठेवणार असून, विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे योग्य समायोजन केले जाईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालकांना दिलासा दिला आहे. विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात सध्या एकूण 1 लाख 8 हजार शाळा आहेत. त्यापैकी सुमारे 18 हजार शाळांमध्ये पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. तरीसुद्धा त्या शाळा सुरूच राहतील. तसेच, त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे. शिक्षकांची कार्यमुक्तता ही समायोजनानंतरच केली जाईल.
शिक्षण राज्यमंत्री भोयर म्हणाले, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला असून, ग्रामीण व आदिवासी भागातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सरकारी शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे अनेक खासगी शाळांतील विद्यार्थी आता जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत.
विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित शाळांनी नियमांची पूर्तता केली असल्यास त्यांना लवकरच पुढील टप्प्याचे अनुदान देण्यात येईल. शाळांना एकाच वेळी संपूर्ण अनुदान देणे शक्य नसले, तरीही टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचे काम निश्चितपणे पूर्ण करू.