Two farmers end their lives due to debt
ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील तामकळस गावात एक हृदयद्रावक घटना घडली. डिगंबर तुकाराम तनपुरे (वय ३३) या डिगंबर तनपुरे तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.११) सकाळी उघडकीस आली.
डिगंबर तनपुरे हे आपल्या वस्तीवरील घरात राहत होते. काही दिवसांपासून संततधार पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकीकडे पीककर्जाचा बोजा, दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारीमुळे ते मानसिक तणावाखाली होते. याला कंटाळून त्यांनी आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. तनपुरे हे बँकेकडून घेतलेले पीककर्ज, जबाबदाऱ्यांमुळे प्रचंड तणाव अनुभवत होते.
कर्ज फेडायचे कसे? आणि घर चालवायचे कसे? अशा विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती दत्ता तुकाराम तनपुरे यांनी ताडकळस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत डिगंबर तनपुरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. गावकऱ्यांनी शासन धोरणांवर नाराजी व्यक्त करत शासनाकडून शेतकऱ्यांना केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात मदत नाही.
केज, पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यातील आडस येथे एका २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊ आत्महत्या केली आहे. तालुक्यातील आडस येथील रवी आकुसकर या २७ वर्ष वयाच्या तरुणाने शेतीवर कुटुंबांचा उदरनिर्वाह भागत नसल्याने बांधकामांवर मिस्त्री म्हणून काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. परंतू अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यात शेतातील उत्पन्न गेल्याने सध्या ग्रामीण भागातील बांधकाम बंद आहेत.
शेतीचे झालेले नुकसान व हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? या नैराश्यातून चिंताग्रस्त असलेल्या रवि आकुसकर याने दि. ९ ऑक्टोबर रोजी गुरूवारी रात्री आडस शिवारातील सोनवळा रस्त्या लगत असलेल्या गायरान जमिनीत पळसाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.
अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्या नंतर दि. १० ऑक्टोबर शुक्रवारी रोजी दुपारी १२:०० वा. आडस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.