Amravati Maharashtra Pakshimitra Samelan
परभणी : यंदाचे ३८ वे महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संमेलन तसेच तिसरे अखिल भारतीय पक्षिमित्र संमेलन अमरावती येथे दि. १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी होत आहे. हे संमेलन वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था, अमरावती यांच्या यजमानपदाखाली होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि “मित्रा” राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी आज (दि.११) दिली.
राज्यातील पक्षीप्रेमी, अभ्यासक आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेली ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ ही संस्था मागील चार दशकांपासून पक्षी अभ्यास, संवर्धन आणि जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. राज्यस्तरावर आणि विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने नियमितपणे आयोजित केली जातात. अशा स्वरूपाचे संघटन आणि पक्षीप्रेमींची संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. आजवर राज्यभरात ३७ राज्यस्तरीय आणि ३० विभागीय संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचे संमेलन दि. १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे. संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून स्थानिक पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यासह राज्याबाहेरील किमान ३०० प्रतिनिधी या संमेलनास उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
संमेलनाध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी हे त्यांच्या प्रशासकीय सेवाकाळापासूनच वन्यजीव आणि पक्षी छायाचित्रण तसेच संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन कार्य, तसेच राज्याच्या वन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांनी जंगल व वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ‘महाराष्ट्र पक्षिमित्र’ या संस्थेशी ते मागील तीन दशकांपासून जोडलेले असून, विविध संमेलनांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन आयोजनात मोलाची भूमिका पार पाडली आहे. सध्या ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या देशातील सर्वात जुन्या वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.