परभणी : आजपासून विशेष ई-पीक पाहणी; अतिवृष्टीतील नुकसानीची नोंद होणार Pudhari File Photo
परभणी

परभणी : आजपासून विशेष ई-पीक पाहणी; अतिवृष्टीतील नुकसानीची नोंद होणार

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीस सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पिकांची नोंदणी करण्यासाठी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे ही विशेष मोहीम शनिवारपासून तीन दिवस राबविण्यात येणार असून तब्बल १ लाख ६९ हजार ६०० शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण ८४८ गावे असून प्रत्येक गावातील किमान २०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण केल्यास १ लाख ६९ हजार ६०० पर्यंतचे उद्दिष्ट या मोहीमेतून पूर्ण होणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित उपविभागीय अधिकारी हे याबाबतचे सूक्ष्म नियोजन करून ही विशेष मोहीम राबविणार आहेत. मोहिमेत पीक पेरणीची माहिती स्वतः शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे गाव नमुना नं. १२ मध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे.

खरीप हंगामातील ८ सप्टेंबर २०२४ अखेर ६२.७० टक्के क्षेत्रावरील पीकपाहणी पूर्ण झाली आहे. १२ व १३ सप्टेंबर रोजी अशी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी दोन दिवसांची विशेष मोहीम राबवून देखील खरीप हंगामात बुधवारपर्यंत (दि.१८) ७२.१० टक्केच ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे, असे जिल्हाधिकारी गावडे यांनी म्हटले आहे.

सर्वांचेच सहकार्य लागणार

विशेष पीक पाहणी मोहीम यशस्वी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेती मित्र, कोतवाल, प्रगतशील शेतकरी, आपले सरकार, सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच युवक मंडळांचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकांची निवड करून त्यांच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत.

उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ई-पीक पाहणी मोबाईल अॅप्लीकेशनची माहिती व जनजागृती सर्व शेतकऱ्यांना व्हावी, त्यांच्या शेतातील पौकाची माहिती त्यांनी स्वतः गाव नमुना नं. सातबारावर नोंदविण्यासाठी प्रोत्साहीत करणे असा विशेष मोहिमेमागील उद्देश आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांनी गावाचे समप्रमाणात विभाजन करून ५० टक्के गावे तहसील कार्यालयामार्फत उर्वरित ५० टक्के गावांमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT