Malakoli Electric Shock Woman Death
माळाकोळी : येथून जवळच असलेल्या वागदरवाडी (ता. लोहा) येथील एका महिलेचा घरात विजेचा धक्का लागून दुर्देवी अंत झाला. चार चिमुकल्यांच्या मायेची सावली काळाने हिरावून घेतल्याची हृदय द्रावकदुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
वागदरवाडी येथील अत्यंत गरीब कुटुंबातील महिला शिवकांता माधव गिरी (वय 40) यांना मंगळवार सायंकाळी सहा वाजता घरकुल बांधकाम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. त्यांना चार लहान मुली असून हे कुटुंब मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवकांत गिरी यांचा अंत्यविधी सुरू असताना चिमुकल्यांच्या निरागस चेहऱ्यावरचे दुःख पाहून जमलेल्या सर्वांचे डोळे पाणावले. दुर्दैवी घटनेमुळे मनाला हेलावणारी घटना यामुळे सामाजिक कार्यकर्ते माऊली गीते यांनी आपण एका मुलीचे कन्यादान करून देणार असे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माऊली गीते, सरपंच नाथराव केंद्रे, विलास केंद्रे, माधवराव केंद्रे, संचालक प्रभू केंद्रे, बालाजी केंद्रे आदी उपस्थित होते. शिवकांता गिरी यांच्या पश्चात पती व चार मुली अशा परिवार आहे.