किनवट : अंबाडी घाटात एका तीव्र अरुंद वळणावर एसटी बस आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जीप चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.१) सकाळी ७.१५ वाजता किनवटजवळ झाला. पप्पू व्यंकटेश गंगुलप्पा (वय ४२, रा. विनायकनगर, चित्तूर, आंध्रप्रदेश) असे मृताचे नाव आहे.
एस.टी. बस (क्र. एमएच १४ बीटी २१०५) ही मंगळवारी सकाळी उनकेश्वरहून किनवटकडे जात होती. यादरम्यान अंबाडी घाटात समोरून भरधाव वेगात येणाऱ्या (क्र. एपी ०२ बीडी ६६६९) या बोलेरो जीपची तीव्र वळणावर या एसटी बसला समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात जीप चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही, अशी माहिती बसचे चालक जी. डी. पंधरे व वाहक जनार्दन वाघमारे यांनी दिली. घटनास्थळी रा.प. किनवट आगार प्रमुख यशवंत खिल्लारे यांनी तत्काळ धाव घेतली. तसेच विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती व विभागीय यंत्र अभियंता अभिजित कोरटकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अंबाडी घाटातील अरुंद व धोकादायक वळणांमुळे अशा अपघातांची शक्यता नेहमीच निर्माण होत असते. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.