Nanded Renovation of Saregaon to Hisa Pathrad road
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मुदखेड तालुक्यातील सरेगाव ते हिस्सा पाथरड रस्त्याच्या नूतनीकरणासाठी काँग्रेस खा. रवींद्र चव्हाण यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे स्पष्ट केल्यानंतर भाजपा खा. अशोक चव्हाण यांचे पुतणे तथा भाऊराव समूहाचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी एका पायाने दिव्यांग असणारे उपोषणकर्ते माधव पांचाळ यांची उपोषण स्थळी भेट घेऊन सदरील रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून देण्याचे आश्वासन दिले. या दोन महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर उपोषणकर्त्यांनी आता उपोषण अस्त्र मागे घेतले आहे.
सरेगाव ते हिस्सा पाथरड दोन किलोमीटर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी प्रहारचे दिव्यांग तालुकाध्यक्ष माधव पांचाळ आणि भास्कर कळणे सोमवारपासून उपोषणाला बसले होते. काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर व संदीपकुमार देशमुख यांनी उपोषणकत्यांची भेट घेऊन खा. रवींद्र संवादा दरम्यान संबंधित रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन कॉंग्रेस खा. रवींद्र चव्हाण यांनी दिले. यासंबंधीचे वृत्त दै. पुढारीतून प्रकाशित होताच भाऊराव उद्योग समूहाचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी उपोषण स्थळी बुधवार रोजी भेट देऊन रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवले जातील असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले, या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतल्याची माहिती दिव्यांग कार्यकर्ते माधव पांचाळ यांनी दिली.
परंतु संबंधित रस्त्याची नोंद शासन दरबारी नसल्याने उपोषणकर्ते माधव पांचाळ यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. परंतु आता खड्डे नेमके कोणत्या निधीतून बुजवले जाणार? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे प्रशासनाने मंगळवारीच रस्त्याची नोंद शासन दरबारी करून रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असे सांगितले होते. तेव्हा अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले असताना आता त्यांच्याच गोटातून खड्डे बुजवण्याचे आश्वासन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिस्सा पाथरड ते सरेगाव दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर कारखान्याच्या विश्वस्तांना आजपर्यंत मागच्या अनेक वर्षांपासून खड्डे दिसले नाहीत का ? खा. रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याची दखल घेताच भाजपाच्या लोकांना निवडणुकीच्या तोंडावर जाग आली आहे.श्रीनिवास पाटील महादवाड, प्रवक्ते (काँग्रेस कमिटी नांदेड)
दिव्यांग कार्यकर्ते माधव पांचाळ यांच्या उपोषणास्थळी काँग्रेस शिष्टमंडळाने भेट दिली. या भेटीत खा. रवींद्र चव्हाण आणि उपोषणकर्ते यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. अशा प्रकारचे वृत्त भाजपच्या गोटात समजताच नाईलाजाने का होईना; उपोषण स्थळी भाऊराव समूहाचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांना भेट देणे भाग पडल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते गोपीराज कळणे पाटील सरेगावकर यांनी दिली.