Nanded MLA Rajesh Pawar Sugar factory
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी साखर कारखानदारांना शेती आणि शेतकरी तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आर्थिक मदतीचे आवाहन केले होते, प्रति टन १५ रुपयांची मागणी केली होती. परंतु त्याबाबत गैरप्रचार करण्यात आला. त्यांनी कारखान्यांना होणाऱ्या फायद्यातून अर्थसाह्य मागितले. तसे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आता कारखान्यांची जबाबदारी आहे की, आपण काटामारू नाहीत हे सिद्ध करण्याची. त्यासाठी आपण प्रत्येक कारखान्यापुढे तात्पुरता धर्मकाटा स्थापन करण्यास तयार आहोत, असे आवाहन आ. राजेश पवार यांनी दिले.
सरकार आणि विरोधक यांच्या वादात आ. राजेश पवार यांनी थेट उडी घेतली असून सरकारची बाजू जोरकसपणे मांडली आहे. साखर कारखान्यांनी त्यांना होणाऱ्या फायद्यातून प्रतिटन १५ रुपये द्यावेत, या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरून विरोधकांनी निव्वळ राजकारण सुरू केले आहे, असा टोकदार आरोप करून आ. राजेश पवार म्हणाले, शेतकरी अडचणीत सापडल्यास त्याला ऐनवेळी तातडीची मदत करता यावी यासाठी प्रत्येक साखर कारखान्याने ठराविक निधी राखीव ठेवावा, अशा सूचना यापूर्वीच शासनातर्फे करण्यात आल्या होत्या. कारण शासन कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची मदत करीत असते.
विरोधकांनी चालविलेल्या दुष्-प्रचारावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आ. राजेश पवार म्हणाले, अगोदरचे सहकार तत्त्वावरील कारखाने तोट्यात जाऊन ते खासगी झाले आणि फायद्यात आले, ही जादू कशी झाली. मापात पाप करू नये, अशी आपली संस्कृती सांगते, मग काटा मारणारे कारखाने कोणते आहेत. मुख्यमंत्र्यांनी अशा कारखान्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाच आहे, परंतु आपण स्वतः नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांपुढे धर्मकाटा स्थापन करण्यास तयार आहोत.
अहोरात्र काम करून आम्ही शेतकऱ्यांच्या उसाचे वजन करून देऊ. कारखान्यांनी आमचे सहकार्य घेऊन गाळपाचा वेग वाढवावा व वजन करण्यासाठी शेतकऱ्यांना ताटकळत ठेवू नये. या माध्यमातून आपण काटामार नाहीत, हे सिद्ध करण्याची आयती चालून आलेली संधी कारखानदारांनी घ्यावी, असे आवाहन सुद्धा आ. पवार यांनी केले.