Nanded Degalur diwali pahat
देगलूर, पुढारी वृत्तसेवा : सूर्योदया आधीचे निरामय वातावरणात एक अनामिक गोडी दरवळत असते. मंद वाऱ्याच्या झुळुकीत बासरीच्या आणि भक्तिगीतांच्या पवित्र शब्दांच्या जादुई सुरात मंदपणे झिरपणारा दीपप्रकाश आणि भक्तीभावात न्हाऊन निघालेली रसिक मंडळी अशी अविस्मरणीय 'दिवाळी पहाट' देगलूर शहराने यंदा प्रथमच अनुभवली.
शहरातील संगीत साधना मंचच्या वतीने प्रथमच 'दिवाळी पहाट' कार्यक्रम शनिवारी (दि.१८) आयोजित केला होता. भूपाळी, अभंग, भक्तिगीते, भावगीते आणि हिंदी भजन व गीतांच्या लय तालात रंगलेली ही दिवाळी पहाट, रसिकांच्या मनात खिळवत ठेवत अविस्मरणीय ठरली. यावेळी श्री सदुरू सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर, तहसीलदार भरत सूर्यवंशी, ज्येष्ठ संगीत गुरु पंडित बाबुराव उप्पलवार, सेवानिवृत्त मुख्याधिकारी रामदास पाटील सुमठानकर, देगलूर नगर परिषदचे मुख्याधिकारी नीलम कांबळे, पोलिस निरीक्षक मारोती मुंढे, संगीत साधना मंचचे अध्यक्ष लक्ष्मण अमृतवार उपस्थित होते. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील बासरीवादक ऐनोद्दीन वारसी, अदिती गोसावी रवंदे, आसावरी जोशी रवंदे, बाळासाहेब पाटील यांनी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर केलीत.
त्यांना संवादिनीवर अभिनय रवंदे, बालाजी सुगावकर तर तबल्यावर प्रकाश सोनकांबळे आणि गंगाधर सुगावकर यांनी साथ दिली. याच कार्यक्रमात सुरेखा मदनुरकर, सोमेश मदनुरकर, चंद्रशेखर कौरवार, रमाताई सांगवीकर, सुजाता कुलकर्णी, गोविंद सुवर्णकार, बालराज ग्रंथमवार, शिवानंद स्वामी, लक्ष्मण अमृतवार, शितल कुलकर्णी, संजय मोतेवार, यशवंत काब्दे, सुरेश देशमुख, डॉ. सुनील जाधव, विजयकुमार दासरवाड या स्थानिक गायकांनी गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सूत्रसंचालन शिवानंद स्वामी यांनी केले. बालाजी सुगावकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संगीत साधना मंचचे अध्यक्ष लक्ष्मण अमृतवार आदींनी पुढाकार घेतला.