मुखेड: तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर, मुखेड नगर परिषदेच्या (न.प.) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत सर्वाधिक उत्सुकता लागून राहिलेल्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून, ते 'खुला प्रवर्ग - महिला' यासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी, आता आपल्याच घरच्या महिलेला संधी मिळावी म्हणून अनेक 'पतीदेव' कामाला लागले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण प्रक्रियेत सर्व प्रवर्गातील मिळून दहा महिला नगरसेविका शहर विकासासाठी आपले योगदान देणार आहेत. या महिला नगराध्यक्ष आणि दहा महिला नगरसेविका अशा एकूण अकरा महिलांच्या नेतृत्वामुळे मुखेड न.प.वर खऱ्या अर्थाने 'महिला राज' येणार आहे.
नगराध्यक्ष पद महिलेसाठी सुटल्याने इच्छुकांमध्ये आता गुप्त हालचालींना वेग आला आहे. रोस्टर पद्धतीचा (आरक्षण चक्र) आढावा घेतल्यास भविष्यात किमान ३० वर्षांनंतर खुल्या प्रवर्गाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'अभी नहीं तो कभी नहीं' (आत्ता नाही तर कधीच नाही) या न्यायाने, न.प.चे माजी पदाधिकारी ही संधी साधण्यासाठी जोरदार रणनीती आखण्यात मग्न आहेत.
मुखेड न.प.वर सातत्याने भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) एकतर्फी वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत हे घटक पक्ष एकत्र असतानाही शिवसेना (शिंदे गट) ने आपला उमेदवार उभा केला होता. त्यामुळे न.प. निवडणुकीत ते एकत्र लढणार की स्वतंत्र, हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी राजकीय निरीक्षकांच्या मते ते स्वतंत्र लढण्याची शक्यता अधिक आहे. काही महिन्यांपूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून या मतदारसंघात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा इरादा वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे हे गट भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता लक्षात घेता, भाजपाला स्वकीय आणि आघाडीच्या विरोधात ही निवडणूक लढवावी लागणार आहे.
न.प.च्या राजकारणात राठोड परिवार सतत सत्तेत राहिलेला आहे. 'क' वर्ग न.प. असूनही अनेक विकास प्रश्न मार्गी लावून नागरिक-भिमुख विकास करणारे गंगाधरराव राठोड हे भाजपाकडून आपला उमेदवार देतात की निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुखेड शहरावर राठोड परिवाराचा प्रभाव असल्याने उमेदवारी निश्चित करण्यात गंगाधरराव राठोड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा मुखेड शहरात फारसा प्रभाव दिसत नाही आणि निवडणुकीसाठी आवश्यक असलेला जनसंपर्क असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीही सध्या या दोन्ही गटांकडे नाही. याउलट, कार्यकर्त्यांच्या बाबतीत भाजपाचे मोठे नेटवर्क असल्याने, ही निवडणूक भाजपा विरुद्ध आघाडी अशी पारंपारिक आणि अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे.